तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित; कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे काय?
विभागीय अधिकाऱ्यांच्या सकारात्मक चर्चेनंतर तुळजापूर एसटी कामगार संघटनेचा निर्णय; उर्वरित मागण्या न सुटल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
तुळजापूर | लोकविचार
तुळजापूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिलेले असहकार आंदोलन व साखळी उपोषणाचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या आंदोलनाच्या नोटिशीनंतर विभागीय कार्यालयाने तातडीने दखल घेत हालचाली सुरू केल्या. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी विभागीय वाहतूक अधिकारी सौ. मथुरा जाधवर यांच्या उपस्थितीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संघटनेने आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत तुळजापूर आगार व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात, ३० सप्टेंबर रोजी दिलेल्या आंदोलनाच्या पत्राच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर सदरील आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, उर्वरित मागण्यांची लवकरात लवकर सोडवणूक न झाल्यास आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
दरम्यान, विभाग नियंत्रकांनी कर्मचारी संघटनेशी समन्वय साधून कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि तक्रारी समजून घेऊन त्याकडे स्वतः जातीने लक्ष देत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित झाले असले तरी तुळजापूर आगारातील कर्मचाऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर प्रत्यक्षात काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलन मागे; प्रश्न मात्र कायम?
कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा तूर्तास मागे घेतला असला तरी ज्या तक्रारी आणि मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती, त्या प्रश्नांचे नेमके काय झाले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असल्याची चर्चा आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
विभागीय अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले तरी कोणत्या तक्रारींवर काय निर्णय झाला, कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि कोणत्या मागण्यांवर पुढील कार्यवाही होणार आहे, याबाबत स्पष्टता अद्याप समोर आलेली नाही.
३० सप्टेंबर रोजी ‘लोकविचार’ने तुळजापूर आगारातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, आगार प्रशासनातील कथित मनमानी आणि ५ ऑक्टोबरला आगार बंदच्या इशाऱ्याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर विभागीय कार्यालयाने तातडीने दखल घेत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.
‘स्वतःचा विषय मार्गी लावून आंदोलनातून माघार?’ चर्चेला उधाण!
दरम्यान, संघटनेने आंदोलन स्थगित केल्याच्या पार्श्वभूमीवर काही कर्मचाऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही संघटनेचे पदाधिकारी दबाव निर्माण करून स्वतःचे प्रश्न मार्गी लावतात आणि त्यानंतर आंदोलनापासून माघार घेतात, अशी दबक्या आवाजात चर्चा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या चर्चेतून मात्र एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येत आहे—आंदोलनाची घोषणा झाली, विभागीय पातळीवर चर्चा झाली आणि आंदोलन स्थगित झाले; पण सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे काय?
कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या रजा, ड्युटी, सेवा ज्येष्ठता, ग्रुप रोटेशन, वाहतूक नियंत्रक कक्षातील मनुष्यबळ, लांब पल्ल्याच्या ड्युट्या, वाहन दुरुस्ती, कथित दंडात्मक कारवाई तसेच प्रशासकीय निर्णयांशी संबंधित प्रश्नांवर आता प्रत्यक्ष कार्यवाही होणार का, हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
आंदोलन स्थगिती की प्रश्नांची सोडवणूक?
आंदोलन स्थगित करणे हा तात्पुरता निर्णय असला तरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक होणे अपेक्षित आहे. विभाग नियंत्रकांनी स्वतः लक्ष घालून तक्रारी सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आता त्या आश्वासनाची अंमलबजावणी कितपत होते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.
उर्वरित मागण्या वेळेत मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केल्याने तुळजापूर आगारातील वादळ सध्या शमले असले तरी पूर्णपणे शांत झालेले नाही. त्यामुळे आंदोलन स्थगित झाले असले, तरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा निकाल कधी लागणार? हा सवाल कायम आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











