तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याची डॉ. तानाजी सावंत यांची मागणी
आधुनिक अग्निशमन यंत्रणा आणि अद्ययावत अग्निशमन वाहन तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात असलेल्या तेरखेडा येथील फटाका उद्योगांची सुरक्षितता लक्षात घेता येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारून आधुनिक अग्निशमन यंत्रणा आणि अद्ययावत अग्निशमन वाहन तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे.
माजी मंत्री तथा भूम परांडा वाशी चे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी पत्रात म्हटले आहे की, त्यांच्या मतदारसंघातील वाशी नगरपंचायतीसाठी अग्निशमन केंद्राच्या बांधकामासह वाहन खरेदीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाशी तालुका व मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.
दरम्यान, वाशी तालुक्यातील तेरखेडा हे गाव अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील असून संपूर्ण महाराष्ट्रात फटाका निर्मिती व उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचे कारखाने आणि गोदामे कार्यरत आहेत. या उद्योगांवर हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, फटाका उद्योगांमध्ये अत्यंत ज्वलनशील व स्फोटक स्वरूपाचे साहित्य वापरले जात असल्याने परिसरात आगीच्या दुर्घटनांचा धोका कायम आहे.
एखादी अनपेक्षित दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे वाहन वेळेत उपलब्ध न झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हजारो कामगारांचे प्राण आणि स्थानिक उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार डॉ. सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे.
त्यामुळे नागरिक व कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्राची (फायर स्टेशन) उभारणी करावी. तसेच तेथे तात्काळ सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आणि अद्ययावत अग्निशमन वाहन (गाडी) तैनात करण्यासाठी संबंधित विभागाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तेरखेडा मधील फटाका उद्योगांची संवेदनशीलता आणि हजारो कामगारांची सुरक्षितता लक्षात घेता शासन या मागणीला किती लवकर मंजुरी देते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











