एसटी भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची आर्थिक लूट करणाऱ्यांची गय नाही; १३,९८० पदांच्या भरतीत पारदर्शकता राखा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
भरतीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या खासगी संस्था व व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; उमेदवारांची फसवणूक होणार नाही याची एसटी प्रशासनाने घ्यावी जबाबदारी
मुंबई | लोकविचार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळात लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून ती नियमानुसार पार पाडावी, तसेच नोकरीच्या आमिषाने कोणत्याही बेरोजगार तरुणाची आर्थिक फसवणूक होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनाने घ्यावी, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
१३ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात एसटी महामंडळाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी भरती प्रक्रियेचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणारी उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांनुसारच झाली पाहिजे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध असावी. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांची फसवणूक होणार नाही, याची संबंधित संस्था आणि एसटी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. नोकरीच्या आशेने पैसे देणाऱ्या तरुणांची अशा प्रकारे आर्थिक फसवणूक होत असून, त्याचा परिणाम महामंडळाच्या प्रतिमेवरही होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागामार्फत अशा बेकायदेशीर प्रकारांची सखोल चौकशी करावी. बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या खासगी संस्था आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. भरती प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उमेदवारांच्या हिताचे रक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शासन व एसटी महामंडळ कटिबद्ध आहे, असा ठाम इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











