फुटीर खासदारांना कोट्यवधींचे लाभ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
धाराशिव लोकविचार
पक्षांतर केलेल्या खासदारांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ देण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. धाराशिव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या विषयावर अनेक खळबळजनक दावे केले.
रोहित पवार म्हणाले की, बंडखोरी करून सत्ताधारी गटात गेलेल्या खासदारांना वैयक्तिक आणि कौटुंबिक विकासाच्या नावाखाली ६० ते ९० कोटी रुपयांपर्यंतचा निधी रोख स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय दरवर्षी सुमारे २५० कोटी रुपयांचा विकासनिधी देण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला. या निधीतील कंत्राटी कामांमधून मोठ्या प्रमाणात कमिशन मिळत असल्याने अनेक खासदारांनी वैचारिक भूमिकेपेक्षा आर्थिक फायद्याला प्राधान्य दिल्याची टीकाही त्यांनी केली. न्यायालयीन प्रकरणांमध्ये मदत करण्याचे आश्वासनही काही खासदारांना देण्यात आले असल्याचा आरोप पवार यांनी केला. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील आमदारांप्रमाणेच सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनाही अपेक्षित निधी मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन कायद्याचा संदर्भ देत पवार म्हणाले की, हा कायदा मंजूर होईपर्यंतच या फुटीर खासदारांचे राजकीय महत्त्व टिकून राहणार आहे. पूर्वी स्वतःच्या पक्षात प्रभावी आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे नेते आता भाजपमध्ये गेल्यानंतर स्वतंत्र भूमिका मांडताना दिसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. संबंधित पक्षांमध्ये लोकशाहीपेक्षा आदेश पाळण्याची संस्कृती वाढल्याची टीकाही त्यांनी केली.
धाराशिवच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी जिल्ह्यात दोन राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिल्यामुळे विकासाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचे म्हटले. या कौटुंबिक राजकारणामुळे जिल्ह्याचे नुकसान झाले असून आगामी निवडणुकांमध्ये मतदार सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


