परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
धाराशिव लोकविचार
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या “झाडे लावा, झाडे जगवा” या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव शहरातील नूतन बांधण्यात आलेल्या मुख्य बसस्थानक परिसरात विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे, बसस्थानक परिसर अधिक हिरवागार करणे आणि “एक कर्मचारी – एक वृक्ष” हा संकल्प प्रत्यक्षात आणणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणासोबतच लावलेल्या रोपांचे संगोपन करून त्यांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी विभागीय अभियंता राहुल पवार,विभागीय वाहतूक अधीक्षक संतोष कोष्टी, आगार व्यवस्थापक प्रवीण भोंडवे, स्थानक प्रमुख मुकेश कोमटवार,यांच्यासह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकविचार – सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद | ८३९००८८७८६


