गॅस एजन्सींमधील कर्मचाऱ्यांसह दलालांचा सुळसुळाट! परस्पर बुकिंग, ओटीपी घोटाळा आणि चढ्या दराने सिलिंडर विक्री सर्वसामान्य ग्राहक त्रस्त
ग्राहकांच्या नावावर बनावट बुकिंग,प्रशासनाची मोठ्या रेस्टॉरंट / हॉटेलांना मोकळीक, छोट्या व्यावसायिकांवरच कारवाई!
धाराशिव | सर्वसामान्य लोकविचार
धाराशिव जिल्ह्यात घरगुती गॅस वितरण व्यवस्थेमध्ये गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, गॅस एजन्सींमध्ये दलालांचे जाळे सक्रिय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. परस्पर ग्राहकांच्या नावावर गॅस बुकिंग करून ओटीपीची मागणी केली जात असून, या माध्यमातून सिलिंडरचा अपहार करून तो चढ्या दराने विक्रीसाठी वळवला जात असल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांच्या मोबाईलवर त्यांनी बुकिंग न करता गॅस सिलिंडर बुक झाल्याचे संदेश येत आहेत. त्यानंतर एजन्सीतील काही कर्मचारी किंवा डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून ओटीपी मागून वितरणाची प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. या गैरप्रकारामुळे संबंधित सिलिंडर दलालांकडे वळवला जात असून, तोच सिलिंडर १४०० ते १८०० रुपयांपर्यंत चढ्या दराने विकला जात असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.याहूनही गंभीर बाब म्हणजे, ज्यांनी प्रत्यक्षात गॅस घेतलेलाच नाही अशा ग्राहकांच्या खात्यावर सिलिंडर वितरित झाल्याची नोंद दाखवली जात असल्याचे दिसून आहे! परिणामी, अनेकांना शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीपासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे आर्थिक फटका बसत असून, ग्राहक मानसिक त्रासालाही सामोरे जात आहेत.स्थानिक नागरिकांच्या मते, एजन्सीतील काही कामगारांना कोणत्या घरातील गॅस कधी संपतो याची माहिती असल्याने तेच या रॅकेटमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी, एजन्सीतील काही अंतर्गत व्यक्ती आणि शहरातील दलाल यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.दरम्यान, शहरातील मोठमोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार यांना गॅस टंचाईचा कोणताही फटका बसत नसल्याचे चित्र आहे. उलटपक्षी, सर्वसामान्य नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना मात्र तासन्तास एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. प्रशासनाकडून कारवाईच्या नावाखाली फक्त फुटपाथवरील वडापाव विक्रेते, चहाच्या टपऱ्या आणि लहान हॉटेल व्यावसायिकांवरच धडक कारवाई केली जात असल्याची टीका होत आहे.“आमच्या नावावर गॅस बुकिंग दाखवून सिलिंडर कुठे जात आहेत, याची सखोल चौकशी करावी. अन्यथा हा काळाबाजार थांबणार नाही,” अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.सदर प्रकरणात संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप असून, गॅस वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच एजन्सीतील कर्मचारी, डिलिव्हरी नेटवर्क आणि दलालांच्या साखळीवर अंकुश ठेवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


