चिवरी-नळदुर्ग बससेवा सुरू! ग्रामस्थांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली
नळदुर्ग लोकविचार प्रतिनिधी, अझहर शेख
ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. चिवरी (ता. तुळजापूर) येथील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण करत अखेर चिवरी ते नळदुर्ग नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार ही बससेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे चिवरी आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
नव्याने सुरू झालेल्या या नळदुर्ग-चिवरी बसचे गावात आगमन होताच प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा दिलासा ही बससेवा विशेषतः शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला तसेच रोजच्या कामानिमित्त नळदुर्ग व इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
वेळेवर बस उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर झाला असून, गावाच्या विकासाला आणि रोजगाराला या निमित्ताने गती मिळणार आहे. ग्रामीण भागातील जीवन अधिक सुलभ करणारा हा लोकाभिमुख निर्णय ठरला आहे.
बसच्या उद्घाटनाप्रसंगी आणि स्वागताच्या वेळी साहेबराव घुगे(जिल्हा सरचिटणीस) सौ. रोहिणीताई मेलगिरी पं. स. उपसभापती) सौ. रंजनाताई राठोड नळदुर्ग मंडळ अध्यक्ष) भोसले पंचायत समितीसदस्य विलास राठोड, श्विवेकानंद मेलगिरी चिवरी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे चिवरीकरांनी प्रशासनाचे आणि आमदारांचे विशेष आभार मानले आहेत.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


