दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव जिल्ह्यात; शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निर्णयाकडे लक्ष
सोलापूर–धाराशिव–लातूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याची माहिती; सोयाबीनसह खरीप पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी होणार
धाराशिव | लोकविचार
महाराष्ट्रातील अनेक भागांत जुलै – ऑगस्ट–सप्टेंबरदरम्यान पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनसह विविध पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, २३ सप्टेंबर रोजी सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाची तूट असून
पावसाचा खंड वाढल्याने शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. सोयाबीन हे मराठवाड्यातील प्रमुख खरीप पीक असून, शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील खरीप उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाजही कृषी क्षेत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. रोहित पवार यांनी पीक नुकसानीची पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी १७ सप्टेंबर रोजी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडून तातडीची मदत करण्याची भूमिका व्यक्त केली होती. पिकांचे सर्वेक्षण, पाणी आणि चारा उपलब्धतेबाबतही उपाययोजना करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सरकारच्या दुष्काळ निकषांनुसार पुढील काळात पीक नुकसानीचे पंचनामे आणि परिस्थितीचे मूल्यमापन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा, पीक विमा आणि तातडीच्या आर्थिक मदतीबाबत कोणती घोषणा होते, याकडे शेतकरी आणि संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात आणि शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळतो का, हे उद्याच्या दौऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











