परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई
मुंबई लोकविचार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत राज्यातील सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासंदर्भातील परिपत्रक एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने जारी केले आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवासी घेणे अथवा उतरविणे यावर बंदी राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळ ही राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असून, एसटीच्या उत्पन्नावर परिणाम करणारी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी अवैध प्रवासी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
बसस्थानक परिसरात अनधिकृत वाहतुकीमुळे निर्माण होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या विशेष मोहिमेत विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षा व दक्षता विभागाचे अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. संबंधित विभाग प्रमुखांनी संयुक्त पथके स्थापन करून नियमित तपासण्या कराव्यात तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करून त्याबाबतचा सविस्तर अनुपालन अहवाल मुख्यालयास सादर करावा, असे आदेशही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


