धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र पुन्हा चर्चेत; बंदीच्या आदेशांनंतरही महिलेला ‘कामाचे आमिष’ कसे?
कालिका कला केंद्र संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार;
जातिवाचक शिवीगाळ, अपमान आणि सोशल मीडियावर १५ लाखांच्या आरोपाची बदनामीकारक पोस्ट केल्याचा आरोप; विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव
धाराशिव | लोकविचार
जिल्ह्यातील कला केंद्रांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला असतानाच एका कथित कालिका कला केंद्र चालक महिलेविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार समोर आली आहे.
कला केंद्रात काम देण्याचे आमिष दाखवून महिलेला बोलावून घेतले, त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व अपमान केला तसेच सोशल मीडियावर खोटी आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित केली, असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.या प्रकरणी पीडित महिलेने २८ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे टपालाद्वारे तक्रार अर्ज साद केला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात कला केंद्रांवर बंदी आणि कठोर कारवाईचे आदेश असताना संबंधित महिलेला कालिका कला केंद्रात कामाच्या आमिषाने का बोलावण्यात आले? तिला पैसे देण्याचा व्यवहार कोणत्या आधारे झाला? बंदी असलेल्या ठिकाणी असे व्यवहार सुरू होते का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
‘काम देते’ म्हणत बोलावले अन् जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपतक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, निर्मला मोहन जाधव यांनी कला केंद्रात काम देण्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर उचल रक्कम देऊन तिला कालिका कला केंद्रात बोलावून घेण्यात आले. मात्र, तेथे गेल्यानंतर तिच्याशी अपमानास्पद वर्तन करण्यात आले आणि तिच्या जातीचा उल्लेख करून जातीवाचक व अपमानकारक शब्दांत शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेने पुढे असा आरोप केला आहे की, तिच्याकडून दिलेली उचल रक्कम परत घेऊन तिला अपमानास्पद पद्धतीने तेथून हाकलून देण्यात आले. या प्रकारामुळे आपल्याला मोठा मानसिक त्रास आणि सामाजिक अपमान सहन करावा लागल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
सोशल मीडियावर ‘१५ लाख रुपये घेऊन पळून गेली’ अशी पोस्ट?
प्रकरण आणखी गंभीर बनवणारा आरोप म्हणजे २४ ऑगस्ट २०२६ रोजी सोशल मीडियावर तक्रारदार महिलेच्या नावासह छायाचित्र प्रसिद्ध करून ती १५ लाख रुपये घेऊन पळून गेल्याचा खोटा आरोप करण्यात आला, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.सदर आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे असून, या पोस्टमुळे नातेवाईक, परिचित आणि समाजातील इतर व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण होऊन आपली बदनामी झाल्याचा आरोप तिने केला आहे.
या पोस्टचे स्क्रीनशॉट, प्रिंटआऊट, लिंक, प्रोफाइलची माहिती, मोबाईल क्रमांक, पोस्टची तारीख व वेळ यांसह उपलब्ध डिजिटल पुरावे तपासात घेऊन पोस्ट कोणी तयार केली, कोणत्या अकाउंटवरून प्रसारित केली आणि ती पुढे कोणी शेअर केली, याचा तांत्रिक तपास करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
कला केंद्र बंद असताना महिलेला बोलावलेच कसे?
या तक्रारीमुळे आता केवळ कथित जातिवाचक शिवीगाळ आणि सोशल मीडिया पोस्टच नव्हे, तर जिल्ह्यातील बंद करण्यात आलेल्या कला केंद्रांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्ह्यातील कला केंद्रांच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि यांनीही कला केंद्रांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत कारवाईचे धोरण स्वीकारले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित कला केंद्रात एखाद्या महिलेला कामाचे आमिष दाखवून बोलावण्यात आले असेल, तर त्या ठिकाणी नेमका कोणता व्यवहार सुरू होता? कोणाच्या परवानगीने किंवा आधारे तो व्यवहार झाला? उचल रक्कम देण्याचा अधिकार कोणाला होता? बंदी असतानाही कला केंद्रात व्यक्तींना बोलावले जात होते का? या प्रश्नांची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
स्थानिक यंत्रणेवर अविश्वास? थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार
विशेष म्हणजे, पीडित महिलेने स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे न थांबता थेट विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्याकडे तक्रार केल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर विश्वास का राहिला नाही?
तक्रारदार महिलेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेण्याची वेळ का आली? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
तक्रारीत संबंधित महिलेविरुद्ध लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, जातिवाचक शिवीगाळ व अपमानाच्या आरोपांची चौकशी करावी, सोशल मीडिया पोस्टबाबत डिजिटल पुरावे जतन करून तांत्रिक तपास करावा तसेच दोष आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने पत्राद्वारे केली आहे.
आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्षजिल्ह्यात कला केंद्रे बंद करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. त्यामुळे कला केंद्र बंद असतानाही तेथे महिलांना कामाच्या आमिषाने बोलावले जात होते का आणि त्यामागे नेमका कोणता व्यवहार किंवा यंत्रणा कार्यरत होती, याचा तपास होणे आवश्यक आहे.
दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीत स्पष्ट होणे बाकी आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोप खरे ठरल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल होणार का? कला केंद्र बंदीच्या आदेशांनंतरही तेथे व्यवहार सुरू होते का? आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोणाचे पाठबळ होते? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











