दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई; १२८ किलो गांजासह आयशर वाहन जप्त, ८० लाख १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत!
नळदुर्ग पोलिसांची सतर्कता अन् संशयित आयशरचा पाठलाग ठरला निर्णायक; दोघांना अटक, आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीचे धागेदोरे असण्याची शक्यता!
धाराशिव | लोकविचार
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी जिल्ह्यात सतर्क राहून पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तुळजापूर-नळदुर्ग-उमरगा परिसरातील महामार्गावर गस्त घालत असताना नळदुर्गच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारे एक संशयित आयशर वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि या वाहनाचा पाठलाग सुरू करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांनी तत्काळ पुढे पेट्रोलिंग करणारे पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांना फोन करून संशयित वाहन थांबविण्याबाबत माहिती दिली. पोलीस हवालदार गाडेकर यांनी प्रसंगावधान राखत नळदुर्ग येथील निरंजन हॉटेलसमोर सदर आयशर वाहन अडविले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार यांनी वाहनाची झडती घेतली असता मागील दरवाजातून गांजासदृश अमली पदार्थ असल्याचा संशय आला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देण्यात आली.
पुढील कायदेशीर कारवाईसाठी शासकीय पंच, फॉरेन्सिक टीम आणि मुद्देमालाचे वजन करण्यासाठी तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शासकीय पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता फॉरेन्सिक टीमच्या तपासणीत वाहनातील पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. वजन केले असता तब्बल १२८.३८ किलो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेला गांजा हा व्यावसायिक प्रमाणातील (Commercial Quantity) असून, गांजा आणि आयशर वाहनाची एकूण किंमत तब्बल ८० लाख १९ हजार रुपये असल्याचे समोर आले.
या प्रकरणात आयशर वाहनचालक आकाश दांगट आणि त्याचा सहकारी महादेव जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास करताना हा गांजा नेमका कोणाकडून आणण्यात आला होता आणि पुढे कोणाला दिला जाणार होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या गुन्ह्यामागे आंतरराज्यीय टोळी सक्रिय असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५९/२०२६, कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २५ व २९ एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार दयानंद गाडेकर, फरहान पठाण, चालक पोलीस हवालदार सुभाष चोरे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल अशोक ढगारे आणि चालक पोलीस शिपाई बाबा गुरव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
विशेष म्हणजे, गांजाची एवढी मोठी खेप पकडल्याने जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











