पथविक्रेत्यांना ओळखपत्र-विक्री प्रमाणपत्र लवकर देण्याच्या सूचना मुख्याधिकारी नीता अंधारे
धाराशिव | लोकविचार
धाराशिव नगर परिषद अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत स्थापित नगर पथविक्रेता समितीची बैठक समितीच्या अध्यक्ष तथा नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाली.
बैठकीत शहरातील पथविक्रेते व फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांसह त्यांना व्यवसायासाठी नियोजित जागा उपलब्ध करून देणे, ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्रांचे वितरण, फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे, अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, पार्किंग झोन व नो-पार्किंग झोन निश्चित करणे तसेच मार्केट डेव्हलपमेंट प्लॅनबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्याधिकारी तथा नगर पथविक्रेता समितीच्या अध्यक्ष नीता अंधारे यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, धाराशिव शहरातील पथविक्रेते व फेरीवाल्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. संबंधित पात्र पथविक्रेत्यांना लवकरात लवकर ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी संबंधित एजन्सीला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
पथविक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायासाठी नियोजित जागा उपलब्ध करून देतानाच शहरातील वाहतूक, स्वच्छता आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर पथविक्रेता समिती गठित करण्यासाठी मागील वर्षी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यानुसार नगर पथविक्रेता समिती अधिकृतरीत्या राजपत्रित झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. अधिनियमानुसार पथविक्रेत्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच विविध निर्णय घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीबाबतही सदस्यांना माहिती देण्यात आली.
बैठकीत ‘पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना, २०२६’ या मसुद्याचे वाचन करण्यात आले. या मसुद्यावर कोणतीही हरकत अथवा सूचना प्राप्त झाली नसल्याने तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
शहरातील पथविक्रेते आणि फेरीवाल्यांना व्यवसायासाठी योग्य व नियोजित जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी विक्रीसाठी १० जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या जागांचा नियोजनबद्ध वापर करून पथविक्रेत्यांना व्यवसायाची सुविधा उपलब्ध करून देतानाच शहरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीचा समतोल राखण्यावर भर देण्यात आला.
पथविक्रेते व फेरीवाल्यांसाठी फेरीवाला क्षेत्र आणि ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. शहरातील रस्त्यांवर अनियंत्रितपणे व्यवसाय झाल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियोजित क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी पथविक्रेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
अतिक्रमणामुळे रस्त्यांवर होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारे अपघात कमी करण्यासाठी पथविक्रेते, फेरीवाले, व्यापारी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत विविध सूचना मांडल्या. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी नियोजित पद्धतीने पथविक्री करण्याचे आवाहन करण्यात आले.
याचबरोबर पार्किंग झोन आणि नो-पार्किंग झोन निश्चित करून त्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक लावण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी संबंधित ठिकाणी स्पष्टपणे फलक लावणे आणि नागरिक व व्यावसायिकांनी त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
पथविक्रेते व फेरीवाल्यांच्या व्यवसायासोबतच शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता राखण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. पथविक्रेत्यांनी घंटागाडीचा तसेच सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या डस्टबीनचा योग्य वापर करावा, कचरा रस्त्यावर टाकू नये आणि शहर स्वच्छ व सुशोभित ठेवण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये तसेच पथविक्रेते आणि व्यापारी यांच्यात अनावश्यक वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पथविक्रेते व फेरीवाल्यांना नियम समजावून सांगून त्यांच्याकडून सहकार्य मिळविण्यासाठी समिती सदस्य स्वतः पुढाकार घेतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
मार्केट डेव्हलपमेंट प्लॅनच्या अनुषंगानेही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील पथविक्रेत्यांना व्यवसायाची संधी मिळावी, त्याचबरोबर नागरिकांना रस्ते, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी सहज व सुरक्षित वावर करता यावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पुढील कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.
पथविक्रेत्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण पूर्ण झाल्याने आता पात्र पथविक्रेत्यांना ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुढे जाणार आहे. त्यामुळे शहरातील पथविक्रेत्यांच्या व्यवसायाला अधिकृत स्वरूप देण्यासोबतच त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण, व्यवसायाचे नियमन आणि शहरातील वाहतूक व स्वच्छता व्यवस्था यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या बैठकीतून करण्यात आला.
शहरातील पथविक्रेत्यांचे प्रश्न, व्यवसायासाठी जागेचे नियोजन, ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्रांचे वितरण, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि शहर विकास यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. पथविक्रेत्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी नियोजित जागा उपलब्ध करून देतानाच शहरातील सार्वजनिक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी प्रशासन, वाहतूक विभाग आणि पथविक्रेता समितीने परस्पर सहकार्याने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीस नगर परिषद उपमुख्याधिकारी अभिजीत गोरे, वाहतूक शाखेचे पोलिस उप निरीक्षक शि. पि. मुंडे, वाहतूक शाखेचे एल. एम. धादागिणे यांच्यासह कालिंदा रामेश्वर पेठे, ताहेरा शब्बीर बागवान, गयासोदीन इमामोदीन शेख, इरफान सत्तार बागवान, सय्यद शाकेर अफसरअली, सय्यद रहेमान अली, शितल देशमुख, उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर, श्रीकांत जाधव, विशाल थोरात, दीपक मोतेवार, चित्रसेन राजेनिंबाळकर, प्रकाश पवार, सचिन गुंजाळ, सतीश सांगळे, युसुफ शेख, रामेश्वर पेठे आदी नगर पथविक्रेता समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वैशाली आवाड यांनी केले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











