कर्तव्यनिष्ठ पोलीस अंमलदार विठ्ठल चौधरी यांना ‘ग्रेड PSI’ दर्जा; पोलीस दलात आनंदाचे वातावरण
धाराशिव लोकविचार
धाराशिव जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि जनसामान्यांशी सलोख्याचे संबंध जपणारे पोलीस अंमलदार विठ्ठल आनंदराव चौधरी यांना “श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (Grade PSI)” हा मानाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या निर्णयानुसार तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
सध्या आनंदनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विठ्ठल चौधरी यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, जबाबदारीची जाणीव आणि नागरिकांशी असलेल्या संवेदनशील वर्तनामुळे त्यांनी पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ग्रेड PSI हा दर्जा त्यांच्या दीर्घकालीन सेवेला आणि कार्यक्षमतेला मिळालेली योग्य पावती मानली जात आहे. या पदोन्नतीमुळे त्यांच्यावर अधिक जबाबदाऱ्या येणार असल्या तरी त्या समर्थपणे पेलण्याची क्षमता त्यांनी आपल्या कामातून वेळोवेळी सिद्ध केली आहे.
विठ्ठल चौधरी यांच्या या यशामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दलातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना या गुणांच्या जोरावर विठ्ठल चौधरी यांनी मिळविलेला हा सन्मान युवा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीतही अशीच यशस्वी वाटचाल राहो, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

