श्री तुळजाभवानी मंदिर जमीन प्रकरणी चौकशी आठवड्यात समिती गठीत करणार – पुजार
जमिनीच्या ७/१२ वर मंदिर संस्थांची नावच नाही !
धाराशिव लोकविचार
लाखो हिंदू भाविकांचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या ४ हजार १२१ एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची आता राज्य शासनामार्फत चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात चौकशी समिती येत्या आठ दिवसात गठीत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दि.४ जुलै रोजी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. पुढे बोलताना पुजार म्हणाले की, तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला जी जमीन इनाम म्हणून दिली होती. याबाबत काही प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत तुळजापूर इनाम जमीन बाबत चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. मूलतः इनाम जमिन ही निजाम सरकारने वेगवेगळ्या मठास काही अटी आणि शर्ती टाकून दिली होती. मात्र या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर मंदिर संस्थानचे नावच नाही. मंत्री बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले असल्यामुळे त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या समितीमध्ये एक वरिष्ठ अधिकारी असेल. या चौकशीमध्ये जमीन प्रदान केलेल्या अटी व शर्तीवर त्याचे पालन होते की नाही ? याची चौकशी होणार आहे. पुढच्या आठवड्यात समिती जाहीर होईल. या चौकशीमध्ये गुंतागुंतीचे विषय लक्षात घेता सखोल चौकशी होईल, असे पुजार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिलेल्या तक्रारीनंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’ देखील लागू होत नाही, असे असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आली आहे. तर श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री ३ हजार ३९७ एकर जमीन असताना प्रत्यक्ष ताबा मात्र चार मठांमधील खाजगी व्यक्तीकडे आहे. तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करून ६३.०३ एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली. तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत २६१ एकर जमीन तब्बल ७३ खाजगी व्यक्तींच्या नावे ७/१२ वर नोंदवली. याशिवाय अपसिंगा आणि उपळा या गावांमधील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला आहे. त्यामुळे या महासंघाच्या तक्रारीची दखल घेऊन राज्य पातळीवरून याची चौकशी होत आहे. त्यामुळे या चौकशीत पुढे काय निष्पन्न होणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


