धाराशिवमध्ये ८० लाखांची रोकड जप्त! काळया इनोव्हाच्या ‘गुप्त’ कप्प्यातून पैशांचा खेळ उघड
धाराशिव लोकविचार
सोलापूरहून जालन्याकडे मोठी रोकड घेऊन जाणाऱ्या इनोव्हा कारला धाराशिव शहर पोलिसांनी वडगाव सिद्धेश्वर परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. MH 21 BQ 8886 क्रमांकाच्या या वाहनातून सुमारे ७५ ते ८० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी वडगाव सिद्धेश्वर / तेरणा इंजिनिअर कॉलेज परिसरात सापळा रचून सदरील वाहन आल्याची खात्री केली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाला संशय आल्याने त्याने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे लावून वाहनाचा पाठलाग करत ते ताब्यात घेतले.
वाहनाची झडती घेतली असता पाठीमागील बाजूस अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्लायवूडची पेटी तयार करून त्यावर साउंड बॉक्स ठेवल्यासारखी रचना करण्यात आली होती. या लपविलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. वाहनातील दोन व्यक्तींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरील प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने यशस्वी सापळा रचून सदरील वाहन ताब्यात घेतले.
जप्त करण्यात आलेली रोकड नेमकी कोठून आली, कुठे नेली जात होती, तिचा व्यवहाराशी काय संबंध आहे तसेच वाहनातून यापूर्वीही अशाच पद्धतीने पैशांची वाहतूक करण्यात आली होती का, याचा तपास सुरू आहे. रोकड खरी आहे की अन्य काही प्रकार आहे, याचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, पुढील तपासासाठी आयकर विभागाला कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जप्त रकमेबाबत न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात रोकड वाहतुकीमागील नेमका ‘खेळ’ काय आहे, याचा उलगडा आता पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणा करणार का, याकडे धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











