महिला प्रवाशांना एसटीचा मोठा दिलासा! एनसीएमसी कार्डच्या अनिवार्यतेला ३१ डिसेंबरपर्यंत शिथिलता; ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेऊन १०० टक्के नोंदणी व वितरणाचे उद्दिष्ट!
गावोगावी विशेष शिबिरांतून कार्ड नोंदणी व वितरण
ग्रामीण भागातील महिलांची अपूर्ण नोंदणी लक्षात घेऊन महामंडळाचा निर्णय;
मुंबई | लोकविचार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळविण्यासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला महामंडळाने शिथिलता दिली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आलेली एनसीएमसी कार्डची अनिवार्यता ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत शिथिल करण्यात येणार आहे.
त्यामुळे अद्याप एनसीएमसी कार्डची नोंदणी अथवा वितरण न झालेल्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील महिलांची अपूर्ण नोंदणी लक्षात घेऊन महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी केले आहे. या पत्राद्वारे सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एसटी महामंडळात ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळविण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता अद्यापपर्यंत केवळ १.१० कोटी एनसीएमसी कार्डची नोंदणी अथवा वितरण झाल्याचे महामंडळाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः गाव-खेड्यांतील महिलांपर्यंत योजनेची माहिती पुरेशा प्रमाणात पोहोचलेली नसल्याने मोठ्या प्रमाणावर नोंदणी अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना सवलतीच्या तिकिटासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याच्या अटीमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार ७ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्डच्या अनिवार्यतेची अट शिथिल करण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व महिला लाभार्थ्यांनी आपापल्या एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
महिला प्रवाशांना कार्ड मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शिबिरांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांची नोंदणी आणि कार्ड वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गावोगावी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर ही मोहीम राबवून ३१ डिसेंबर २०२६ अखेर १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी, तसेच महिला प्रवाशांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
एनसीएमसी कार्ड नोंदणीच्या प्रक्रियेमुळे सवलतीच्या तिकिटापासून महिला प्रवाशांना वंचित राहावे लागू नये, यासाठी महामंडळाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना कार्ड नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे महिला प्रवाशांना सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून, एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











