येडशीत अग्नितांडव! दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घरही भक्ष्यस्थानी;
दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाला वाचविण्यात यश
धाराशिव | लोकविचार
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आज पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अग्नितांडवाने संपूर्ण गाव परिसर हादरून गेला आहे. दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घरालाही वेढा घातल्याने गोविंद करंडे यांच्या कुटुंबातील सहा जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह दोन ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश असल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथे पहाटेच्या सुमारास एका दुकानाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील घरालाही आपल्या विळख्यात घेतले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत गोविंद करंडे यांच्या कुटुंबातील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर एका व्यक्तीला वाचविण्यात यश आले.घटनेची माहिती मिळताच तुळजापूर आणि कळंब येथून अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. गावकऱ्यांनी, पोलिसांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सर्वतोपरी प्रयत्न करूनही सहा निष्पाप जीवांना वाचविण्यात यश आले नाही.दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने येडशी गावावर शोककळा पसरली आहे. पहाटेच्या शांततेत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण धाराशिव जिल्हा सुन्न झाला असून, करंडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

भावपूर्ण श्रद्धांजली!#येडशी #धाराशिव #अग्नितांडव #दुर्दैवीघटना #करंडेकुटुंब










