एसटीच्या ८३ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कर्मचाऱ्यांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय!
प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर — कर्मचाऱ्यांच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणून प्रताप सरनाईक यांचे सर्वत्र कौतुक
मुंबई | लोकविचार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेणे आणि त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणून प्रताप सरनाईक यांच्याकडे पाहिले जात आहे.
५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.
एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून राज्यातील लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सेवा देतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून नोकरदारांपर्यंत प्रत्येकाला एसटीच्या सेवेचा आधार आहे. या सेवेमागे कर्मचाऱ्यांचे कष्ट, त्याग आणि समर्पण आहे. त्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांच्या कष्टाचा सन्मान आणि हक्क असल्याची भावना या निर्णयामागे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयामुळे एसटी महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. मात्र, आर्थिक अडचणी असल्या तरी कर्मचाऱ्यांच्या सणाचा आनंद महत्त्वाचा असल्याचे सांगत प्रताप सरनाईक यांनी कर्मचारी हिताला प्राधान्य दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे आणि महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन आणि महामंडळ कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांकडून आभार मानले जात आहेत. दिवाळीच्या सणात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा निर्णय त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ करणारा ठरत आहे. कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणारे नेतृत्व म्हणून प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











