‘लोकविचार’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब! धाराशिव नगरपरिषदेतून चार अधिकाऱ्यांच्या बदल्या; शहराला मिळाले केवळ दोन अधिकारी
२९ जूनच्या वृत्तानंतर ३० ऑक्टोबरला बदली आदेश; रिक्त पदांचे संकट अधिक गंभीर, दुष्काळात पाणीपुरवठ्याचा कारभार पुन्हा तारेवर
धाराशिव | लोकविचार
धाराशिव नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, वाढता प्रशासकीय ताण आणि अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत ‘लोकविचार’ने २९ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. धाराशिव नगरपरिषदेतील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यांच्या जागी केवळ दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे आधीच रिक्त पदांच्या संकटाचा सामना करणाऱ्या धाराशिव नगरपरिषदेच्या प्रशासकीय अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
‘लोकविचार’ने २९ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात नगरपरिषदेतील रिक्त पदे, अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण, राजकीय हस्तक्षेप आणि अंतर्गत गटबाजीमुळे प्रशासन तणावाखाली असल्याचे वृत्त दिले होते.
तसेच पाच ते सहा राज्यस्तरीय अधिकारी बदलीसाठी शासनाकडे प्रयत्नशील असल्याची माहितीही प्रसिद्ध केली होती. आता प्रत्यक्ष बदली आदेश निर्गमित झाल्याने या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.
चार अधिकाऱ्यांची बदली; दोघांची धाराशिवमध्ये नियुक्ती
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद सेवा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विनंती व विशेष बाब म्हणून करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये धाराशिव नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या ३० ऑक्टोबरच्या आदेशानुसार धाराशिवमधून चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर औसा येथून एक तर नागपूर येथून एका अधिकाऱ्याची धाराशिव नगरपरिषदेत नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये लेखापाल व लेखा परीक्षक अश्विनी दिलीप जाधव यांची बार्शी नगरपरिषद येथे; कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी अक्षय उत्तम बनसोडे यांची लोहारा नगरपरिषद येथे,पाणीपुरवठा अभियंता संग्राम संजय भापकर यांची फलटण नगरपरिषद, जिल्हा सातारा येथे;तर स्थापत्य अभियंता विष्णू दशाजी सानप यांची संगमनेर नगरपरिषद, जिल्हा अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे.
दुसरीकडे, औसा नगरपरिषद, जिल्हा लातूर येथून स्थापत्य अभियंता श्रेणि (ब) संदीप संजयप्रसाद दुबे आणि नगरपरिषद अभियंता श्रेणी क विवेक जोतिराम खंडागळे यांची धाराशिव नगरपरिषदेत नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच चार अधिकारी धाराशिवमधून बाहेर जाणार असून, त्यांच्या जागी केवळ दोन अधिकारी उपलब्ध होणार आहे.
दुष्काळात पाणीपुरवठ्याचा कारभार कोण सांभाळणार?
सध्या धाराशिव जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करणे आणि नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून देणे ही नगरपरिषद प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर यांची फलटण येथे बदली झाल्याने या विभागाच्या कामकाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर त्यांना शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, जलस्रोत, वितरण यंत्रणा, सुरू असलेली कामे, तांत्रिक अडचणी आणि संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती समजून घेण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असताना अनुभवी अधिकाऱ्याची बदली झाल्याने प्रशासनाला नव्याने नियोजन करावे लागणार आहे. संबंधित पदावर नवीन अधिकारी उपलब्ध होईपर्यंत कामकाजाची जबाबदारी कोणाकडे राहणार, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
रिक्त पदांचा भार, प्रशासनासमोर नवे आव्हान
धाराशिव नगरपरिषद ही जिल्ह्याच्या मुख्यालयाची नगरपालिका असून, शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती, कर वसुली, बांधकाम परवानग्या आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तिच्यावर आहेत. यापूर्वीच नगरपरिषदेतील राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची ३८ मंजूर पदे असून त्यापैकी केवळ १६ पदे भरलेली आणि २२ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली होती.
अशा परिस्थितीत चार अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन केवळ दोन अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने उपलब्ध मनुष्यबळावर आणखी ताण येण्याची शक्यता आहे. नवीन अधिकारी रुजू होणे, त्यांना विभागाची माहिती देणे आणि प्रलंबित कामांचा आढावा घेणे या प्रक्रियेतही वेळ जाणार आहे.
नगरपरिषद प्रशासनातील रिक्त पदे तातडीने भरणे, बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अनुभवी अधिकारी उपलब्ध करून देणे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर परिणाम होऊ न देणे, ही आता प्रशासनासमोरील प्रमुख आव्हाने ठरणार आहेत.
‘लोकविचार’च्या वृत्ताची पुन्हा चर्चा
२९ जून रोजी ‘लोकविचार’ने नगरपरिषद प्रशासनातील तणाव, रिक्त पदे आणि अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष बदली आदेश निर्गमित झाले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेतील प्रशासकीय स्थितीबाबत ‘लोकविचार’ने मांडलेल्या मुद्द्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय श्रेयवाद आणि प्रशासकीय अडचणींच्या चर्चेपलीकडे आता शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत मिळणे महत्त्वाचे आहे. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा विभाग सक्षम ठेवणे, रिक्त पदे भरणे आणि अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी स्थिर वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
धाराशिव नगरपरिषदेतून चार अधिकारी बदली होऊन बाहेर जात असताना केवळ दोन अधिकारी नव्याने नियुक्त झाल्याने आगामी काळात नगरपरिषदेचा कारभार पुन्हा तारेवरची कसरत ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लोकविचार’ — सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद 8390088786











