तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज; ९८० बसेस तैनात तीन शिफ्टमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती – अजय पाटील
धाराशिव | लोकविचार
तुळजाभवानी देवीच्या यात्रेनिमित्त तुळजापूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. धाराशिव विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या नियोजनातून यात्रेच्या कालावधीत महाराष्ट्रातील विविध विभागांच्या तब्बल ९८० बसेस भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार असून कर्नाटक राज्यासाठी आणखी १०० बसेस तुळजापूर आगारात ठेवण्यात येणार आहेत.
२४ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत यात्रेसाठी धाराशिव, बीड, लातूर आणि परभणी विभागांच्या एकूण ६५० बसेस, तर पुणे प्रदेशातून ३३० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये धाराशिव विभागाच्या २६०, बीडच्या १७५, लातूरच्या १०० आणि परभणीच्या ११५ बसेसचा समावेश आहे. सर्व बसेस चालक-वाहकांसह सेवेत राहणार आहेत.
यात्रेतील गर्दी आणि वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन अधिकारी व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचीही विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन शिफ्टमध्ये कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. पुणे प्रदेशातून येणाऱ्या बसेसच्या व्यवस्थेसाठी २ सहायक वाहतूक अधीक्षक, ४ वाहतूक निरीक्षक, ४ सहायक वाहतूक निरीक्षक आणि १८ वाहतूक नियंत्रक, असे एकूण २८ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
विविध ठिकाणी बस पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था
यात्रेदरम्यान बसस्थानक परिसरात होणारी गर्दी आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बस पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटकच्या १०० बसेस तुळजापूर आगारात ठेवण्यात येणार असून धाराशिव रोडवरील मुक्तांगण शाळा परिसरात धाराशिव, सोलापूर, बीड आणि परभणी विभागाच्या बसेसचे पार्किंग केले जाणार आहे. पुणे प्रदेशाच्या बसेससाठी मंगरूळ रोड, तर लातूर विभागाच्या बसेससाठी काक्रंबा बायपास चौक परिसर निश्चित करण्यात आला आहे.
पार्किंगच्या ठिकाणी वीज, पिण्याचे पाणी आणि ध्वनिक्षेपकाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुळजापूर नवीन बसस्थानकातील प्रकाशयंत्रणा सुरळीत ठेवण्याबरोबरच भाविकांच्या सोयीसाठी यात्रा शेड उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये, बस वाहतूक वेळेत आणि सुरक्षितपणे सुरू राहावी, तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे यासाठी एसटी महामंडळाने विभागनिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या नियोजनातून करण्यात आलेल्या या विशेष व्यवस्थेमुळे तुळजाभवानी यात्रेतील एसटी वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान एस टी महामंडळ कडे असणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











