प्रशासनाची प्रसिद्धी लोकप्रतिनिधींना खटकली; श्रेयवादाच्या राजकारणात नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
काम प्रशासनाचे, श्रेय कुणाचे? श्रेयवादाच्या राजकारणात प्रशासनाचा जनजागृतीचा मार्गच बंद?
नगरपरिषदेत पत्रकारांसाठी सुरू केलेला माहितीचा व्हॉट्सॲप समूह अचानक बंद; प्रशासनाच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नावर प्रश्नचिन्ह
धाराशिव | लोकविचार
शहरातील नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या योजना, उपक्रम आणि शासकीय निर्णयांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये असलेला समन्वय महत्त्वाचा मानला जातो. मात्र धाराशिव नगरपरिषद प्रशासनाने पत्रकारांना एकत्रित माहिती मिळावी, या उद्देशाने सुरू केलेला धाराशिव नगर परिषद व पत्रकार व्हॉट्सॲप समूह अचानक बंद झाल्याने शहरात श्रेयवादाच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिव नगरपरिषदेकडून शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्ती, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, कर वसुली, पथदिवे, विविध विकासकामे, महिला व बचतगटांसाठीच्या योजना, शहरी उपजीविका योजना, पथविक्रेत्यांसाठीच्या योजना तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा वापर केला जातो. प्रशासनाकडून अधिकृत माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचली की त्याचे वृत्तांकन होऊन ती माहिती मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील हा संवाद केवळ प्रसिद्धीपुरता नसून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरतो.
नगरपरिषदेसोबतच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अन्य शासकीय विभागांकडूनही शासनाच्या योजना, आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळी उपाययोजना, महसूल सेवा, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, रोजगार, शेतकरी योजना, आरोग्य, शिक्षण, निवडणूक जनजागृती, आपत्कालीन सूचना आदी विषयांची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. प्रशासनाने केलेल्या कामाची अधिकृत माहिती वेळेवर जनतेसमोर जाणे ही पारदर्शक प्रशासनाच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे.
याच पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपरिषद प्रशासनाने पत्रकारांसाठी सुरू केलेला व्हॉट्सॲप समूह अचानक बंद झाल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. या समूहामध्ये नगरपरिषदेकडून राबविण्यात येणारे उपक्रम, प्रशासकीय निर्णय आणि विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी पत्रकारांना उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे पत्रकारांना माहिती मिळणे सोपे झाले होते आणि नागरिकांपर्यंतही ती माहिती जलदगतीने पोहोचत होती.
मात्र काही लोकप्रतिनिधींकडून या समूहाबाबत आक्षेप घेत प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा नगरपरिषद वर्तुळात सुरू आहे. प्रशासनाच्या माध्यमातून एखाद्या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध झाल्यास त्याचे श्रेय कोणाला मिळणार, यावरूनच हा वाद निर्माण झाला का? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. या चर्चेला अधिक बळ मिळाले ते नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी अभिजीत गोरे यांनी समूह बंद करण्यापूर्वी केलेल्या शेवटच्या पोस्टमुळे.
उपमुख्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षकअभिजीत गोरे यांनी या समूहावर, “धाराशिव शहरातील प्रशासनाशी संबंधित माहिती व राबविलेले उपक्रम याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या समूहाची स्थापना केली होती. परंतु काही गैरसमज निर्माण झाल्यामुळे मला हा समूह बंद करावा लागत आहे. त्याबद्दल मी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करतो व समूह बंद करत आहे,” अशी भूमिका मांडली. त्यानंतर समूह बंद करण्यात आल्याने प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
लोकप्रतिनिधींनी शहरासाठी आणलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर करणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने केलेल्या प्रशासकीय कामांची अधिकृत माहिती जनतेपर्यंत पोहोचणेही तितकेच आवश्यक आहे. विकासकामांचे श्रेय कोणाला मिळते, यापेक्षा नागरिकांना कामाची आणि योजनेची माहिती मिळते का, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे परस्परविरोधी घटक नसून नागरिकांच्या हितासाठी दोघांची भूमिका वेगवेगळी असली तरी परस्परपूरक आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रसारमाध्यमांशी अधिकृत संवाद ठेवणे, योजनांची माहिती देणे आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती करणे यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या कामाची माहिती प्रसिद्ध झाली म्हणून श्रेयाचा प्रश्न निर्माण होण्याऐवजी, त्या माहितीचा लाभ किती नागरिकांपर्यंत पोहोचला, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. नगरपरिषद प्रशासनाने पत्रकारांसाठी सुरू केलेला माहितीचा समूह बंद होण्यामागे नेमका कोणत्या नेत्याचा “बालहट्ट” होता याचे स्पष्टीकरण संबंधितांकडून मिळणे आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करण्याची गरज!
लोकप्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी निवडून आलेले असतात. त्यामुळे शहरासाठी विकासकामे, निधी, नवीन योजना आणि शासनस्तरावरून आणलेल्या सुविधा यांची माहिती स्वतःच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणे हीच त्यांची खरी प्रसिद्धी ठरली पाहिजे. प्रशासन आपल्या पातळीवर नागरिकांसाठी राबवित असलेल्या योजना आणि उपक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवत असेल, तर त्यात अडथळे निर्माण करण्यापेक्षा त्या कामांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. स्वतःची कामे आणि योजना जनतेसमोर मांडण्याऐवजी प्रशासनाच्या कामाच्या प्रसिद्धीवर आक्षेप घेणे म्हणजे चालत्या गाडीला अडथळा निर्माण करण्यासारखे ठरू नये. श्रेय कोणाचे, यापेक्षा शहराच्या विकासाचे आणि नागरिकांच्या हिताचे काम पुढे जाणे महत्त्वाचे आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786










