पदवीधरांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करा; शरद पवारांचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना मार्गदर्शन
मुंबई | लोकविचार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान पदवीधरांचे प्रश्न, युवकांचे भवितव्य आणि मराठवाड्याच्या विकासासंदर्भात चर्चा झाली.
यावेळी शरद पवार यांनी डॉ. पाटील यांना पदवीधर मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला न्याय देण्याचे आवाहन केले. पदवीधरांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. शिक्षण, रोजगार आणि युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे काम करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. पदवीधरांचे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या मार्गदर्शनानंतर आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मराठवाड्यातील पदवीधरांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही दिली. शिक्षण क्षेत्रातील अडचणी, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच युवकांच्या रोजगाराच्या संधी यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदवीधरांचा आवाज विधान परिषदेत प्रभावीपणे मांडून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद ही आपल्यासाठी मोठी प्रेरणा असून, पुरोगामी विचार, सर्वसमावेशक विकास आणि लोकसेवेची परंपरा पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची भावना डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
या सदिच्छा भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख आणि माजी खासदार वंदना चव्हाण उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











