“लाडक्या” गुत्तेदाराचा प्रताप! सावरकर चौक ते काळा मारुती चौक रस्त्याच्या कामात साईडपट्ट्यांवर चक्क काळ्या मातीचा भराव; नगर परिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, वाहतुकीलाही अडथळा!
धाराशिव | लोकविचार
धाराशिव शहरातील विकासकामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील सावरकर चौक ते काळा मारुती चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे काम सुरू असून, या कामात साईडपट्ट्या भरण्यासाठी चक्क शेतातील काळ्या मातीचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांचे काम पूर्ण झाले असून, त्यानंतर नाल्यांच्या बाजूला भराव टाकून साईडपट्ट्या तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी मुरुमाऐवजी काळी माती टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या मधोमध काळ्या मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
धाराशिव शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा मारुती चौक परिसरात शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक खरेदीसाठी येत असतात. अशा वर्दळीच्या भागातील रस्त्याच्या कामातच जर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असेल, तर भविष्यात नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. काळ्या मातीचा भराव पावसाळ्यात किंवा पाणी लागल्यानंतर खचण्याची शक्यता असल्याने रस्त्यावर चिखल होण्या बरोबरच रस्त्याच्या कामाच्या टिकाऊपणाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराकडे धाराशिव नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष आहे की नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. विकासकामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने प्रत्यक्ष कामाची पाहणी करून दर्जाची खातरजमा करणे अपेक्षित आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी काळ्या मातीचा वापर सुरू असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
आता तरी या भागातील लोकप्रतिनिधींनी आणि नगर परिषद प्रशासनाने या कामात तातडीने लक्ष घालावे, काळ्या मातीचा भराव हटवून त्याऐवजी नियमानुसार मुरुमाचा वापर करावा आणि संपूर्ण कामाचा दर्जा तपासावा, अशी जोरदार मागणी होत आहे. मुख्य बाजारपेठेतील या महत्त्वाच्या रस्त्याचे काम तरी दर्जेदार होणार का? की “लाडक्या” गुत्तेदाराच्या मनमानीपुढे प्रशासन असेच दुर्लक्ष करणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











