मालमत्ता कर अभय योजनेचा ३० हजार नागरिकांनी घेतला लाभ – नीता अंधारे
६ कोटी ५१ लाख ७० हजार कर वसुली ५ कोटी २५ लाख १७ हजार व्याज माफी मिळणार
धाराशिव – लोकविचार धाराशिव नगर परिषद अंतर्गत मालमत्ता मालमत्ता करापोटी मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम होती. मात्र दंडाची रक्कम वाढत असल्याने ती भरण्यास अनेकांना इच्छा असताना देखील आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून ऑगस्ट २०२५ पासून मालमत्ता कर अभय योजना सुरू केली. त्यास आजपर्यंत ३० हजार २५ नागरिकांनी प्रतिसाद देत ६ कोटी ५१ लाख १७ हजार ९१० रुपये मालमत्ता करांचा भरणा केला आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरणा केलेल्या नागरिकांना ५ कोटी २५ लाख ७० हजार ५९० रुपये व्याज अर्थात दंड माफी मिळणार आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के जास्तीची कर वसुली झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली.धाराशिव शहरातील नागरिकांनी मालमत्ता करांचा भरणा करावा यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात होते. मात्र, त्यास नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नागरिकांना कर भरणार रकमेतून सूट मिळावी यासाठी प्रशासन कालावधीमध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दि.१३ ऑगस्टपासून मालमत्ता कर अभय योजना सुरू केली. ती योजना दि४ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहिली. तर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी मालमत्ता कर अभय योजना सुरू करण्यास सर्वसाधारण सभेमध्ये दि.३१ मार्चपर्यंत मान्यता दिली. त्यामुळे नागरिकांनी ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मालमत्ता कर भरणा केला आहे. या करामध्ये शिक्षण कर, रोजगार हमी उपकर, वृक्ष कर, अग्निशमन कर, दिवाबत्ती कर आदी मालमत्ता करांचा समावेश आहे. मालमत्ता कर भरणा केलेल्या नागरिकांना ५ कोटी २५ लाख ७० हजार ५९० रुपये व्याज अर्थात दंड माफी मिळण्याचा ठराव नगर परिषदेच्या सभागृहाने दि.२८ एप्रिल रोजी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देताच ती माफी दिली जाणार आहे. शिक्षण संस्थेच्या वसुलीचे प्रमाण अत्यल्प मालमत्ता अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील खाजगी शिक्षण संस्थांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सर्वच खाजगी शिक्षण संस्थांनी मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


