अभिनेता रितेश देशमुख- जेनेलिया देशमुख यांची एस टी महामंडळाच्या जनजागृती ब्रँड ॲम्बेसेडरपदी नियुक्ती – परिवहनमंत्री सरनाईक
मुंबई – लोकविचार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ला अधिक प्रभावी आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करून जनजागृती उपक्रमाला नवे बळ मिळाले आहे.या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यामुळे एसटी महामंडळाच्या उपक्रमांना राज्यस्तरावर अधिक दृश्यमानता मिळणार असल्याचे मानले जात आहे.परिवहन मंत्री सरनाईक यांनी या निर्णयामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी लोकप्रिय आणि जनमानसात विश्वासार्ह असलेल्या व्यक्तिमत्त्वांची साथ आवश्यक असते. रितेश-जेनेलिया देशमुख यांची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये सकारात्मक असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत संदेश अधिक वेगाने आणि परिणामकारकपणे पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमांमध्ये आता या दोन्ही कलाकारांचा सक्रिय सहभाग राहणार असून, रस्ता अपघात कमी करणे, सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देणे आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.परिवहन विभागाच्या या उपक्रमामुळे केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष जनतेच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट होत आहे. मंत्री सरनाईक यांच्या या पुढाकारामुळे राज्यातील रस्ता सुरक्षा मोहिमेला नवी दिशा मिळाल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786


