“जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ‘तळे’! नागरिकांना पर्यायी वाटांचा शोध”
अवकाळी पावसाने उघड केली प्रशासनाची बेफिकिरी; वयोवृद्ध व दिव्यांगांची मोठी गैरसोय
धाराशिव | लोकविचार
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याचे तळे साचल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सायंकाळी झालेल्या अल्पकालीन अवकाळी पावसानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याने येत्या पावसाळ्यात काय होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी दररोज जिल्ह्याच्या खेडोपाड्यातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना अक्षरशः पाण्यातून मार्ग काढत आत जावे लागत आहे. विशेषतः वयोवृद्ध, दिव्यांग तसेच महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी तर पर्यायी मार्ग शोधून कार्यालयात प्रवेश करण्याचा पर्याय निवडला.या ठिकाणी साचलेले पाणी निचरा न झाल्याने घाण वाढली असून अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अशी अवस्था असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.“जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच ही परिस्थिती असेल, तर इतर भागांची अवस्था काय असेल?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तात्काळ पाणी निचऱ्याची व्यवस्था करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

