‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा’; धाराशिवच्या २३.६६ टीएमसी पाण्यासह प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे आंदोलन
धाराशिव लोकविचार
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा’ या जनआंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम आणि कालबद्ध निर्णय देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली.
धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे कृष्णा-मराठवाडा योजनेतील २३.६६ टीएमसी पाणी तातडीने जिल्ह्याला मिळावे, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, नोव्हेंबर २०२५ मधील प्रलंबित नुकसानभरपाई अदा करावी, रोजगार हमी योजनेतील थकीत ३.५ लाखांची रक्कम द्यावी आणि पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच नादुरुस्त व धोकादायक शाळा खोल्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, सीना-कोळेगावपर्यंत पाणी पोहोचवावे, गळती होणाऱ्या साठवण तलावांचा प्रश्न मार्गी लावावा, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्ह्यातील सर्व MIDC, धाराशिव विमानतळ तसेच सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
वर्षानुवर्षे विकासाच्या घोषणा आणि आश्वासने केली जात असताना प्रत्यक्षात अनेक प्रश्न जैसे थेच आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता प्रत्येक प्रलंबित प्रश्नावर कालबद्ध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
धाराशिव जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष दूर होईपर्यंत आणि रखडलेली कामे प्रत्यक्ष मार्गी लागेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, संजय निंबाळकर, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, दिलीप घुगे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

#शिवसेना #ShivsenaUBT #मराठवाडा #आंदोलन #धाराशिव #Dharashiv










