दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या दिवाळीत गोडवा; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून दोन लाख कुटुंबांना दिवाळी शिधा
एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उपक्रमाचे आयोजन; २ व ३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी वाटप, शेतकरी कुटुंबांशी साधणार संवाद
धाराशिव | लोकविचार
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा गोडवा निर्माण करण्यासाठी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने जिल्ह्यातील सुमारे दोन लाख कुटुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, येत्या २ आणि ३ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी शिधा वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या माध्यमातून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या घरात दिवाळीचा प्रकाश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यंदा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतीतील उत्पन्नावर परिणाम झाल्याने अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीसारख्या सणाचा आनंद साजरा करणे अनेकांसाठी कठीण बनले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून दिवाळी शिधा वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा या शिध्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. साखर, मैदा, रवा, बेसन, डालडा यांसह पणत्या, उटणे, लक्ष्मीची पावले आणि नवीन वर्षाची दिनदर्शिका अशा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पारंपरिक सणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत शेतकरी कुटुंबांना सणाचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
तामलवाडीपासून पारगावपर्यंत शिधा वाटपाचे कार्यक्रम
या उपक्रमांतर्गत २ नोव्हेंबर रोजी तामलवाडी, येणगूर आणि उत्तर जवळा येथे दिवाळी शिधा वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर ३ नोव्हेंबर रोजी पळसप, येडशी, येरमाळा आणि पारगाव येथे शिधा वाटप करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार असून, शेतकरी कुटुंबांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि परिस्थिती जाणून घेणार आहेत.
जिल्ह्यातील सुमारे दोन लाख कुटुंबांपर्यंत दिवाळी शिधा पोहोचविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून ठेवण्यात आले आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात आधार देण्यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
दुष्काळातही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही : प्रताप सरनाईक
यासंदर्भात बोलताना परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या घरातील चूल विझू नये, त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवू नये आणि दुष्काळाच्या संकटातही त्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा महत्त्वाचा घटक असून, त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही आपली जबाबदारी आहे.”
संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबरच त्यांच्या मनात जगण्याचा विश्वास निर्माण करणे हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी असल्याचे प्रतिपादनही मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या काळात दिलासा देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे. सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये, या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा गोडवा निर्माण होणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











