कंत्राटी कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लाभ मिळावेत; भाजप शहर उपाध्यक्ष स्वप्नील शिंगाडे यांचे नगर परिषदेला निवेदन
धाराशिव लोकविचार
धाराशिव नगर परिषदेत कार्यरत असलेल्या अकुशल व कुशल कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार मानधन मिळावे, तसेच त्यांना पी.एफ. आणि इन्शुरन्ससारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे धाराशिव शहर उपाध्यक्ष स्वप्नील सुनिलराव शिंगाडे यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेत अनेक कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. शासनाने किमान वेतन कायद्याअंतर्गत वेळोवेळी मानधनात वाढ करण्याबाबत परिपत्रके जारी केली असतानाही संबंधित कामगारांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याशिवाय, कंत्राटी कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) आणि विमा (इन्शुरन्स) योजना लागू करून त्यांना कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ वेळेत देण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कंत्राटी कामगारांचे आर्थिक व सामाजिक संरक्षण अधिक सक्षम व्हावे, त्यांच्या कुटुंबांना सुरक्षिततेची हमी मिळावी आणि शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने हे निवेदन देण्यात आल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.
नगर परिषद प्रशासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन कंत्राटी कामगारांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088886


