नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा; एसपी रितू खोखर यांची मंदिर, यात्रा परिसराची पाहणी
धाराशिव | लोकविचार
तुळजापूर येथे होणाऱ्या श्री शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी तुळजापूर येथे भेट देत श्री तुळजाभवानी मंदिर परिसरासह यात्रा परिसर आणि वाहन पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत सुरक्षा व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.
तुळजापूर येथे दि. ११ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रासह विविध भागांतून लाखो भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दाखल होणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात तसेच शहरातील प्रमुख मार्ग, यात्रा परिसर आणि वाहन पार्किंगच्या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये तसेच गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी प्रत्यक्ष तुळजापूर येथे भेट देऊन मंदिर परिसर, यात्रा परिसर आणि वाहन पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी केली. गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर नियोजन केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या पाहणीवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.











