कळंबमध्ये एमडी ड्रग्जचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईमुळे कळंब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
धाराशिव लोकविचार
धाराशिव जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या धडक कारवाईमुळे कळंब शहरातील एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जच्या विक्रीचे जाळे उघडकीस आले आहे. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 11.21 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, या प्रकरणामुळे कळंब पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला धाराशिव जिल्ह्यात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली पथक कळंब परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे कळंब-येरमाळा रोडवरील पायरा तलावाजवळ सापळा रचण्यात आला.या ठिकाणी संशयित निखिल जाधव व अरविंद कांबळे यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 29 पारदर्शक प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये ठेवलेले 11.21 ग्रॅम पांढऱ्या रंगाचे स्फटिक स्वरूपातील एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 326/26 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
कळंब पोलिसांवर उपस्थित झाले गंभीर प्रश्नया संपूर्ण कारवाईनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, कळंबसारख्या शहरात इतक्या गंभीर स्वरूपाचा एमडी ड्रग्जचा व्यवसाय सुरू असताना स्थानिक पोलीस ठाण्याला याची माहिती कशी नव्हती?स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून आरोपींना अटक केली, मात्र स्थानिक पोलिसांच्या हद्दीत सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवहाराचा मागोवा स्थानिक यंत्रणेला का लागला नाही, हा तपासाचा आणि आत्मपरीक्षणाचा विषय ठरत आहे.
त्यामुळे या प्रकरणाकडे पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने पाहून स्थानिक पोलिसांच्या कामकाजाचाही आढावा घेण्याची आवश्यकता असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
या कारवाईत दोन आरोपी जेरबंद झाले असले तरी त्यांच्या मागे अमली पदार्थांचा मोठा पुरवठादार किंवा संघटित रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोघांकडून सखोल चौकशी करून एमडी ड्रग्जचा पुरवठा करणारे मुख्य सूत्रधार, त्यांचे नेटवर्क आणि आर्थिक व्यवहार उघड करणे अत्यंत आवश्यक आहे. या तपासातून जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या विक्रीचे मोठे जाळे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईचे सर्वत्र कौतुकधाराशिव जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
युवकांना नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी अशा धडक मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेचे आणि धाडसी कारवाईचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786
#ड्रग्स #अमली_पदार्थ #पोलिस #crime #धाराशिव #कळंब


