खा. ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
धाराशिव लोकविचार
धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला महत्त्वाची गती मिळाली असून, केंद्रीय विद्यालय विभागीय कार्यालय, मुंबईच्या पथकाने आज प्रस्तावित जागेची व आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्रीय विद्यालय स्थापनेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.
पाहणीवेळी केंद्रीय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त ए. सी. पाटील, के. व्ही. भांडुपचे प्राचार्य ए. सी. राजपूत आणि के. व्ही. सोलापूरचे प्राचार्य उमाकांत जोशी यांनी प्रस्तावित जागेची पाहणी करून आवश्यक सुविधांची माहिती घेतली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला असून, त्यासंदर्भातील उत्तर २७ जुलै रोजी केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे. त्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करण्यासाठी हे पथक धाराशिवमध्ये दाखल झाले होते.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पथकाचे स्वागत करून धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली.
यावेळी सोमनाथ गुरव, अमित उंबरे, सह्याद्री राजेनिंबाळकर, गणेश जगताप, आकाश कोकाटे, अमित लाटे, आकाश कावळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेसाठी सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार केंद्रीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्याच्या आशा अधिक बळावल्या आहेत.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


