बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरण पुन्हा ऐरणीवर कारवाई न झाल्यास पुराव्यानिशी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चा तीव्र एल्गार
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील कथित बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणात वारंवार निवेदने, स्मरणपत्रे आणि चौकशीची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)ने केला आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण पुराव्यानिशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिली.
यापूर्वी जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत ग्रामसेवकांच्या कथित बनावट सह्या, बनावट शिक्के आणि खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदण्या करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाला निवेदन तसेच स्मरणपत्रही सादर करण्यात आले होते. मात्र, अद्यापही या प्रकरणात कोणतीही ठोस चौकशी अथवा दोषींवर कारवाई झालेली नसल्याने संशय अधिकच बळावल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)च्या वतीने लवकरच संपूर्ण कागदपत्रे, पुरावे आणि संबंधित नोंदींसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनातून कथित बोगस नोंदणी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि शासनाच्या निधीचा झालेला कथित अपहार वसूल करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
प्रशासनाने वेळेत योग्य ती कारवाई केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आंदोलनाची तारीख आणि पुढील भूमिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


