त्रुटींचा भडिमार; अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
तीनही प्रस्तावांमध्ये बांधकाम, नाहरकत प्रमाणपत्रासह विविध आक्षेप; पोलिस अधीक्षकांच्या अहवालाचाही परिणाम — जिल्ह्यात नव्या ६ पैकी एकाही कला केंद्राला परवानगी नाही
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यात नवीन कला केंद्र सुरू करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. अंबिका, न्यू रेणुका आणि प्यासा या तीन कला केंद्रांचे प्रस्ताव विविध त्रुटी, बांधकामातील अनियमितता आणि अन्य आक्षेपांमुळे नाकारण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सुनावणीअंती घेतलेल्या निर्णयानंतर अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी नुकतेच याबाबत आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी ६ कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, नवीन सहा प्रस्तावांपैकी एकालाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
कला केंद्रांच्या प्रश्नावर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी ठोस / आक्रमक भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
अंबिका, न्यू रेणुका प्रस्तावांवर गंभीर आक्षेप
कळंब तालुक्यातील वडगाव ज. येथे अंबिका लोकनाट्य सांस्कृतिक लावणी कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब तानाजी पवार यांनी, तर न्यू रेणुका लोकनाट्य कला केंद्रासाठी येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी प्रस्ताव सादर केला होता. तसेच आळणी येथे प्यासा लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्यासाठी श्रीपाल नारायण वीर व कळंब तालुक्यातील भाटशीरपुरा येथील शितल अच्युतराव गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केला होता. गायकवाड हे धाराशिव येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत सेवेत असल्याची माहिती आहे.
वडगाव ज. येथील गट क्रमांक ४५ मध्ये सुधीरकुमार सुधर्म सस्ते यांच्या जागेत न्यू रेणुका कला केंद्र सुरू करण्यासाठी ११ डिसेंबर २०२४ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तर वडगाव ज. येथील गट क्रमांक २० मध्ये दत्तात्रय सत्यवान मुंढे यांच्या जागेत अंबिका कला केंद्र सुरू करण्यासाठी १५ मे २०२५ रोजी अर्ज करण्यात आला होता.
गेल्या एक ते दीड वर्षांपासून नवीन कला केंद्र सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. विभागीय आयुक्तांपासून न्यायालय आणि मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणात काही जिल्ह्यातील (सत्ताधारी) नेत्यांनीही (लोकप्रतिनिधी) प्रतिष्ठा पणाला लावल्याची चर्चा होती. मात्र, प्रशासनाच्या सुनावणीत प्रस्तावांमधील त्रुटी आणि आक्षेप समोर आल्यानंतर अखेर परवानगीचा मार्ग बंद झाला.
ग्रामस्थांच्या तक्रारी, नाहरकत प्रमाणपत्रावरही आक्षेप
अंबिका आणि न्यू रेणुका या दोन्ही कला केंद्रांच्या प्रस्तावांमध्ये बांधकाम परवाना व इतर बाबींमध्ये त्रुटी आढळल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पद्मसिंह दत्तात्रय मुंढे व इतर २२५ ग्रामस्थांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.
या तक्रारीत नाहरकत प्रमाणपत्र बोगस असल्याचा तसेच ग्रामसभा नियमानुसार घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला होता.
न्यू रेणुका कला केंद्राच्या ठिकाणी एका सभागृहाला जोडून १७ स्वतंत्र बंद खोल्या असलेले बांधकाम करण्यात आले होते. तर अंबिका कला केंद्राच्या ठिकाणी एका सभागृहाला जोडून ७ स्वतंत्र बैठक रूम आणि १० स्वतंत्र निवासी रूम बांधण्यात आल्याचे नमूद आहे. स्वतंत्र बंद बैठक खोल्या आणि निवासी बांधकामाची तरतूद नसल्याचा आक्षेप घेण्यात आला.
याशिवाय पोलिस अधीक्षकांनीही हरकत असल्याचा अहवाल सादर केला होता. विविध बाबींमध्ये त्रुटी आढळल्याने अखेर दोन्ही प्रस्ताव नाकारण्यात आले.
प्यासा कला केंद्राच्या प्रस्तावातही अनेक आक्षेप
आळणी येथील गट क्रमांक ४१५ मध्ये श्रीपाल वीर यांच्या जागेत प्यासा कला केंद्र सुरू करण्यासाठी ८ मे २०२५ रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्या जागेत सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रमाची इमारत उभारायची होती, त्या जागेवर कायमस्वरूपी इमारत अगोदरच उभी करण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
याशिवाय संबंधित इमारतीपासून दर्शन बिअर बार व परमिट रूम अवघ्या २५ फूट अंतरावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मान्यतेसाठी सादर केलेले रेखांकन हे हॉटेल-रेस्टॉरंटच्या वाणिज्यिक प्रयोजनासाठी दाखविण्यात आले होते. तसेच येथे एक सभागृह आणि त्याला जोडून २३ स्वतंत्र बंद खोल्या असल्याचे दाखविण्यात आले होते.
या सर्व बाबींचा विचार करून प्यासा कला केंद्राचा प्रस्तावही नाकारण्यात आला.
परवाना नसतानाही अंबिका कला केंद्राचा बोर्ड; यंत्रणा सज्ज असल्याचा आरोप
दरम्यान, अंबिका कला केंद्राला अद्याप परवाना नसतानाही तेथे नावाचे बोर्ड लावून इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली होती आणि खास ग्राहकांसाठी शाही सोय करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वडगाव ज., आळणी आणि चोराखळी ही कला केंद्र असलेली गावे असून, येथील काही ग्रामस्थांचा कला केंद्रांना विरोध असल्याचे सांगण्यात येते, तर काही कला केंद्रांना देवी-देवतांची नावे देण्यात आली आहेत.
कला केंद्रांभोवती वादांची मालिका; गुन्ह्यांच्या घटनांनीही प्रश्नचिन्ह
जिल्ह्यातील काही कला केंद्रांवर यापूर्वी हाणामारीचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी नर्तिकांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे, लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्याचे नमूद असून, या प्रकरणांमध्ये गुन्हेही दाखल झाले आहेत. कला केंद्रांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचेही सांगण्यात येते.
त्यामुळे नवीन कला केंद्रांना परवानगी देताना प्रशासनाकडून बांधकाम, कायदेशीर कागदपत्रे, ग्रामस्थांच्या हरकती, पोलिसांचा अहवाल आणि इतर सर्व बाबींची काटेकोर तपासणी केली जात असल्याचे या प्रकरणातून दिसून येते.
जुने परवाने रद्द; नव्यांना अद्याप हिरवा कंदील नाही
बाबासाहेब घाटे यांच्या ‘पिंजरा’ तसेच अक्षय साळुंके यांच्या ‘महाकाली’ कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी नव्याने ‘नटरंग’ या कला केंद्रासाठी प्रस्ताव दिला आहे.
तसेच अरविंद गायकवाड यांनी तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील ‘चंद्राई’ कला केंद्रासाठी अर्ज केला आहे. मात्र, या प्रस्तावांसह नवीन कला केंद्रांच्या अनेक प्रस्तावांमध्ये विविध त्रुटी असल्याने जिल्हा प्रशासनाने नवीन एकाही कला केंद्राला परवाना मंजूर केलेला नाही.
एकीकडे जुने परवाने रद्द आणि दुसरीकडे नव्या प्रस्तावांवर त्रुटींचा ठपका; त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात कला केंद्रांच्या परवान्याचा विषय पुन्हा एकदा प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे चर्चेत आला आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











