औसा-भिवंडी बससेवेला धाराशिव आगाराची जोड; प्रवाशांना मोठा दिलासा
आगार व्यवस्थापक प्रवीण भोंडवे यांच्या नियोजनातून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बससेवा; एसटीचे उत्पन्न वाढविण्यावरही भर
धाराशिव | लोकविचार
ग्रामीण भागातील प्रवाशांची वाढती मागणी, प्रवाशांना वेळेत व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने धाराशिव आगाराने औसा-भिवंडी बससेवा सुरू केली आहे. विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या आदेशानुसार आणि धाराशिव आगार व्यवस्थापक प्रवीण भोंडवे यांच्या नियोजनातून ही बससेवा सुरू करण्यात आली असून, या निर्णयाचे प्रवासी वर्गातून स्वागत होत आहे.
धाराशिव आगारातून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना आता या नव्या बससेवेमुळे अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. औसा येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता बस सुटून सायंकाळी ६ वाजता धाराशिव येथे पोहोचणार आहे. त्यानंतर ही बस धाराशिवमार्गे भिवंडीकडे रवाना होणार आहे. तसेच भिवंडीहून दररोज सायंकाळी ४ वाजता सुटणारी बस धाराशिव येथे सकाळी ५.१५ वाजता पोहोचणार आहे. या वेळापत्रकामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही आपल्या प्रवासाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.
ही बस औसा, बोरफळ, टेंभी, कोळेवाडी, शिवली, मेंढा, पडोळी, समुद्रवाणी फाटा, कामेगाव फाटा, चिखली, दारफळ फाटा, सारोळा, सुतमिल, सांजा, धाराशिव, नारी, बार्शी, भूम, पाथरूड, खर्डा, जामखेड, आष्टी, कडा, चिंचोली पाटील, अहिल्यानगर, टाकळी ढोकेश्वर, आळेफाटा, सरळगाव, टोकवडा, मुरबाड, कल्याण मार्गे भिवंडी असा प्रवास करणार आहे.
औसा व परिसरातील ग्रामीण भागातून भिवंडी तसेच या मार्गावरील विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, थेट व सोयीची बससेवा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना प्रवासासाठी इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन धाराशिव आगाराने नव्या बससेवेचे नियोजन केले. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना एसटीच्या माध्यमातून सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा प्रवास करता येणार आहे.
“प्रवासी हेच एसटीचे दैवत असून, त्यांना वेळेत, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट – प्रवीण भोंडवे
“प्रवासी हेच एसटीचे दैवत असून, त्यांना वेळेत, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या धोरणानुसार विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या आदेशाने औसा-भिवंडी बससेवा सुरू करण्यात आली आहे,” अशी माहिती आगार व्यवस्थापक प्रवीण भोंडवे यांनी दिली.
दरम्यान, धाराशिव आगाराची ही बससेवा भिवंडीपर्यंत सुरू झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नवीन बससेवेमुळे प्रवाशांना थेट आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असून, एसटीने अशाच प्रकारे प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन मार्गांवर सेवा सुरू करावी, अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीबरोबरच प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने धाराशिव आगाराकडून करण्यात आलेला हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











