समर्थ नगरातील अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा नागरिकांचे जिल्हाधिकारी,नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
धाराशिव लोकविचार
समर्थ नगर दक्षिण भागातील ॲड. बिराजदार यांच्या घरापासून सय्यद पाशा यांच्या घरापर्यंत सुरू असलेले डांबरीकरणाचे काम मागील पाच-सहा महिन्यांपासून अपूर्ण असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे काम तात्काळ पूर्ण करून नागरिकांची समस्या दूर करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक,जिल्हाधिकारी डॉ.कीर्ती किरण पुजार, नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अपूर्ण रस्त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून नाल्या बुजल्याने पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन रोगराईचा धोका निर्माण झाला असून, पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ते दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रस्त्याचे काम अपूर्ण का राहिले, याची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी तसेच कामाचा दर्जा तपासल्याशिवाय कोणतेही देयक अदा करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्यास अथवा जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित प्रशासन, कंत्राटदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समर्थ नगरमधील नागरिकांनी दिला आहे.
निवेदनावर मनोज सुतार, शेख इरफान, पठाण इम्रान, आदिल कुरणे, अख्तर मुल्ला, सय्यद फकीर, बागवान एजाज, सय्यद साबीर शहाबुद्दीन, देवलकर विशाल, शेख अझरुद्दीन, सय्यद सिराज, पठाण आयुब खान, इमरान बागवान, सय्यद फिरोज, राम काटे, बागवान इरफान, शेख अझर, जिकरे मुबशीर, बागवान अझर,निसार बागवान, सय्यद सरफराज, शाहरुख बागवान, शेख सुलतान, नजीर बागवान, इमरान सय्यद, सलमान पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











