कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीवरही एस पी रितू खोखर यांचे मौन!
कळंब | लोकविचार
कळंब शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली असतानाच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ड्रग्जविरोधात आक्रमक भूमिका घेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला अभय न देता कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, या भूमिकेनंतरही स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा वेग पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत कळंब येथील नगरसेवक मोसिन सलीम मिर्झा, लखन गायकवाड,निखिल जाधव,अरविंद कांबळे, अक्षय रीटे, सुशांत सुतार या सहा आरोपींपर्यंत तपास पोहोचल्याचे समोर आले असले, तरी ड्रग्जचा मूळ स्रोत, पुरवठ्याची संपूर्ण साखळी, मुख्य सूत्रधार आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत तपास नेमका किती पुढे गेला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे कारवाई केवळ अटक केलेल्या आरोपींपुरतीच मर्यादित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक शितल रामचंद्र चोंदे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडे लेखी निवेदन देत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यामध्ये आरोपी पोलीस ठाण्यात असताना त्यांना भेटण्यासाठी काही व्यक्तींना परवानगी कोणी दिली, याचाही तपास व्हावा आणि संबंधित कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज जतन करावे, कळंब पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांकडून तपास काढून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपास देण्यात यावा अशी मागणी चोंदे यांनी केली आहे. मात्र, या निवेदनाचे पुढे काय झाले? त्यावर पोलीस प्रशासनाने कोणती चौकशी सुरू केली? याबाबत अद्याप सार्वजनिकरीत्या स्पष्ट उत्तर समोर आलेले नाही.
एकीकडे पालकमंत्री सरनाईक ‘ड्रग्ज हे विष असून राजकारणापेक्षा समाजहित महत्त्वाचे’ अशी कठोर भूमिका मांडत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील तपासाची गती आणि संशयित बाबींवरील मौन यामुळे विरोधाभास निर्माण होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना कारवाई संथ का आहे, अशी कुजबुज आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. मात्र, या चर्चांना तथ्य आहे की नाही, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाचीच आहे.
पालकमंत्र्यांची आक्रमक भूमिका केवळ वक्तव्यापुरती होती की त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष पोलीस कारवाईतही दिसणार आहे, हा प्रश्न आता कळंबकरांसह संपूर्ण जिल्ह्यासमोर आहे.
ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यात राजकीय दबाव, आर्थिक व्यवहार किंवा कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाला थारा न देता स्वतंत्र आणि पारदर्शक तपास होणे गरजेचे आहे. नगरसेवक चोंदे यांच्या तक्रारीतील आरोपांचीही निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.
आता प्रश्न सरळ आहे—पालकमंत्र्यांच्या कठोर निर्देशानंतरही कळंब ड्रग्ज प्रकरणातील तपासाची गती वाढणार का? नगरसेवकाच्या तक्रारीची चौकशी होणार का? आणि ड्रग्जच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन खरोखरच कठोर पावले उचलणार का?
लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद 8390088786










