शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध – आ. डॉ. पाटील
जायकवाडीतून चार पाणी आवर्तने मंजूर
धाराशिव लोकविचार
जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आणि उन्हाळी हंगामासाठी एक, अशी एकूण चार पाणी आवर्तने मंजूर करण्यात आली आहेत. पहिले आवर्तन ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती औरंगाबाद पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ प्रतापसिंह पाटील यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना वेळेवर पाणी मिळावे, कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचावे आणि पाणी वाटपात कोणत्याही भागावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रभावी नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. माजी मंत्री आ.राजेश टोपे यांच्या सह डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पाच पाणी आवर्तने देण्याची मागणी लावून धरली असून, सध्या चार आवर्तने मंजूर झाली आहेत. जानेवारी महिन्यात पाणी साठ्याचा फेरआढावा घेतल्यानंतर पाचव्या आवर्तनासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पक्षीय राजकारणाची किनार न देता त्यांच्या हक्काचे पाणी शेतापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर मंजूर आवर्तनांची प्रभावी अंमलबजावणी आणि अतिरिक्त आवर्तनासाठी आमचे प्रयत्न कायम राहतील,”असे आश्वासन डॉ पाटील यांनी बैठकीत व्यक्त केले.
या बैठकीस लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य यांच्यासह इतर समिती सदस्य व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.











