धाराशिव दि.०४ (अमजद सय्यद):येडशी येथील कालिका ढाबा येथे वेटर म्हणून काम करणाऱ्या मुकुंद माधव कसबे (रा. मोहा, ता. कळंब) यांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ अखेर उकलले असून ढाबा मालक राहुल बाळासाहेब देशमुख याला आनंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला तक्रारदार म्हणून पुढे आलेला राहुल देशमुखच अखेर आरोपी ठरला असून त्याच्याविरोधात भादवी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ मार्च २०२४ रोजी मुकुंद कसबे हा कालिका ढाब्यावर काम करत असताना ढाब्यासमोर पडून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र २३ मार्च रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या वेळी ढाबा मालक राहुल देशमुख याने तक्रार देत “तो काँक्रेटवर पडल्याने मृत्यू झाला” असे सांगितले होते. त्यामुळे धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची (कलम १७४ सीआरपीसी) नोंद करण्यात आली.
मात्र तब्बल १५ महिन्यांनंतर, २ जून २०२५ रोजी, त्याच राहुल देशमुखने पुन्हा तक्रार दाखल केली. यात त्याने सांगितले की, कसबे याला बार्शीकडून आलेल्या मोटारसायकलने धडक दिली, त्यानंतर तो ढाब्याकडे चालत येऊन काँक्रेटवर पडला आणि कानातून रक्त येऊ लागले. या नव्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादवी कलम ३०४ अ, २७९ व मोटार वाहन नियम १८७ नुसार गुन्हा नोंदवला. दोन वेगळ्या कहाण्यांमुळे प्रकरण अधिकच गडद झाले होते.
विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी हा तपास ग्रामीण पोलिसांकडून आनंदनगर पोलिसांकडे वर्ग केला. प्रभारी पोलिस अधीक्षक शफकत आमना, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड व सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी कसून तपास करून आरोपी देशमुखे याला अखेर अटक केली. जिल्हा सरकारी वकील ऍड. महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दडवलेले पुरावे, जबाब व वैद्यकीय कागदपत्रांचा अभ्यास करून तपास पुढे नेण्यात आला.
कसबे यांच्या वैद्यकीय उपचारातील तब्बल सहा पाने सुरुवातीच्या तपासात लपवण्यात आली होती. पोस्टमार्टम अहवालात त्यांच्या हातावर, खांद्यावर, पिंडरीवर मारहाणीच्या जखमा असल्याचे स्पष्ट नमूद होते. तसेच अंतर्गत रक्तस्त्रावामुळे डोळ्यांतून रक्त झाल्याचेही नोंद होते. तरीही ग्रामीण पोलिसांनी अंतिम अहवाल सादर करताना ही महत्वाची तथ्ये दडवून टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी आरोपींना हेतुपुरस्सर पाठीशी घालून पुरावे दडपल्याचा संशय व्यक्त होत असून २०१ च पुरावा नष्ट केला म्हणून त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या प्रकरणावर “लोकमदत” न्यूजने सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून, गुपितं उघड करून, आणि मृतकाला न्याय मिळवून देण्यासाठी ठाम भूमिका घेतली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच प्रकरणातील गूढ उलगडले आणि आरोपीवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली असून आज देशमुख याला न्यायालयात हजर केले जाणार आहे
आरोपी राहुल देशमुख अखेर गजाआड झाल्याने कसबे यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र केवळ आरोपीवरच नव्हे, तर सुरुवातीला गोलमाल करणारे आणि पुरावे दडवणारे तसेच या संपूर्ण प्रक्रियेतील मास्टरमाइंड म्हणजेच “केंद्र” बिंदू तपासून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या वरही कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी आता नातेवाईक व नागरिकांकडून जोर धरत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद – 8390088786
