नीरा-भीमा जोड बोगद्याचे काम जून २०२३ पासून बंद; धाराशिवच्या पाणीप्रश्नावर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील गप्प का? – तानाजी जाधवर
२.६९ किलोमीटरचे काम अद्याप अपूर्ण; निधीअभावी महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प रखडला, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांचा सवाल
धाराशिव | लोकविचार
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नीरा-भीमा जोड बोगद्याचे काम रखडल्याने जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धाराशिव जिल्ह्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प आर्थिक नियोजनाअभावी जून २०२३ पासून बंद आहे. त्यामुळे सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होत असून, या गंभीर प्रश्नावर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही भूमिका स्पष्ट करावी, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी उपस्थित केला आहे.
नीरा-भीमा जोड बोगद्याची एकूण लांबी २३.६८ किलोमीटर असून, त्यापैकी आतापर्यंत २०.९९ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित २.६९ किलोमीटर काम अद्याप चार ठिकाणी अपूर्ण आहे. उद्धट बंधाऱ्याच्या बाजूला १.०८ किलोमीटर ओपनकट आणि त्यापुढील ८०० मीटर बोगद्याचे काम बाकी आहे. तर उजनीच्या बाजूला भादलवाडीजवळ ४४८ मीटर बोगदा आणि अंतिम ३६० मीटर ओपनकटचे काम अपूर्ण आहे.
विशेष म्हणजे, आर्थिक नियोजनाअभावी जून २०२३ पासून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम ठप्प आहे. आता काम पुन्हा सुरू झाले तरी ते पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची चिन्हे आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकणारा सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडत असेल, तर सरकारच्या विकासाच्या दाव्यांचा उपयोग काय? प्रकल्पाचे काम जून २०२३ पासून बंद असताना त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून कितपत पाठपुरावा झाला? भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या प्रश्नावर बोलून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस भूमिका मांडावी, अशी मागणीही तानाजी जाधवर यांनी केली आहे.
धाराशिवच्या जनतेला आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष पाणी हवे आहे. त्यामुळे नीरा-भीमा जोड बोगद्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करून निधीची तरतूद करावी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी जाधवर यांनी केली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











