हक्काचे पाणी कधी मिळणार? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे बंद; पंपगृहाचे कामही संथ!
अपूर्ण कामे तातडीने सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करू – आमदार कैलास पाटील यांचा सरकारला इशारा
धाराशिव लोकविचार
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील नीरा–भीमा जोड बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृहाच्या कामांची आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर उपस्थित होते.
धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना हक्काचे पाणी मिळवून देणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांची कामे बंद असून पंपगृहाचे कामही संथ गतीने सुरू असल्याचे पाहणीत समोर आले. त्यामुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळणार कधी, असा सवाल उपस्थित करत बंद कामे तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली. अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी दुष्काळी भागाला मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यातून ७ टीएमसी पाणी २३.६८ किलोमीटर लांबीच्या नीरा–भीमा बोगद्याद्वारे उजनी जलाशयात आणले जाणार आहे. त्यापैकी ५.३२ टीएमसी पाणी करमाळा तालुक्यातील दहिगाव येथून २६.८५ किलोमीटर लांबीच्या जेऊर बोगद्याद्वारे मिरगव्हाण पंपगृहापर्यंत नेण्यात येणार आहे. तेथून ३.०८ टीएमसी पाण्याचा उपसा करून सीना–कोळेगाव जलाशयात, तर २.२४ टीएमसी पाणी बंद नलिका गुरुत्व वाहिनीद्वारे सीना नदीत सोडले जाणार आहे.
नीरा–भीमा बोगद्याचे जून २०२३ पासून काम बंद२३.६८ किलोमीटर लांबीच्या नीरा–भीमा बोगद्यापैकी २०.९९ किलोमीटर काम पूर्ण झाले असून चार ठिकाणी मिळून २.६९ किलोमीटर काम अद्याप बाकी आहे.
उद्धट बंधाऱ्याच्या बाजूला सुरुवातीचे सुमारे १.०८ किलोमीटर ओपनकट आणि त्यापुढील ८०० मीटर बोगद्याचे काम अपूर्ण आहे. तसेच उजनीच्या बाजूला भादलवाडीजवळ ४४८ मीटर बोगदा आणि शेवटच्या ३६० मीटर ओपनकटचे काम बाकी आहे. आर्थिक नियोजनाअभावी जून २०२३ पासून हे काम बंद आहे. आता काम सुरू केले तरी ते पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जेऊर बोगद्याचे २.८८ किलोमीटर खोदकाम बाकी२६.८५ किलोमीटर लांबीच्या जेऊर बोगद्यापैकी २३.९७ किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले असून सात ठिकाणी मिळून २.८८ किलोमीटर खोदकाम बाकी आहे.
२७ जुलै २०२४ पासून या बोगद्याचे काम बंद आहे. दहिगाव येथे उजनीतून पाणी घेणारी प्रवेश संरचना अद्याप अपूर्ण आहे. दहिगाव ते जेऊर दरम्यान सर्वाधिक सुमारे २.७१ किलोमीटर खोदकाम बाकी आहे.
कोंढेज–सरपडोह दरम्यान २७ मीटर, तर मिरगव्हाणजवळ सीना नदीच्या बाजूला सुमारे १३३ मीटर खोदकाम बाकी आहे. याशिवाय इतर दोन ठिकाणी मिळून सुमारे ७ मीटर किरकोळ खोदकाम अपूर्ण आहे.
मिरगव्हाण पंपगृहाचे ४० टक्के काम बाकीमिरगव्हाण पंपगृहाच्या १११.५८ कोटी रुपयांच्या कामापैकी आतापर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ४० टक्के काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या पंपगृहात प्रत्येकी १,९४० अश्वशक्तीचे सात पंप बसवण्यात येणार असून त्यांची एकूण क्षमता १३,५८० अश्वशक्ती इतकी आहे.
हक्काच्या पाण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावानीरा–भीमा बोगदा पूर्ण झाल्याशिवाय हक्काचे ७ टीएमसी पाणी उजनीत येणार नाही. जेऊर बोगदा पूर्ण झाल्याशिवाय हे पाणी मिरगव्हाणपर्यंत पोहोचणार नाही आणि पंपगृह पूर्ण झाल्याशिवाय ते सीना–कोळेगाव जलाशयात पोहोचू शकणार नाही.
प्रकल्पातील हे तिन्ही टप्पे एकमेकांशी जोडलेले असताना त्यांची कामे रखडल्याने धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे नीरा–भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद असलेली कामे तातडीने सुरू करावीत, मिरगव्हाण पंपगृहाच्या कामाला गती द्यावी आणि मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या पाहणीवेळी मकरंद राजे निंबाळकर, शिवाजी दादा सरडे, जिल्हा परिषद सदस्य सातपुते सर, प्रवीण कोकाटे, रवी वाघमारे, पंकज पाटील, सौदागर जगताप, राणा बनसोडे, राहुल पाटील, शौकत शेख, सुनील गरड, दयानंद थोरात, राकेश सूर्यवंशी, अमोल मुळे, मनोज पडवळ, अर्जुन पाटील, अभिराज कदम, राज जाधव, अशोक साळुंके, कार्यकारी अभियंता नाईक, घनवट आदी उपस्थित होते.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद Amjad K. Sayyad 083900 88786











