मालकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी तीन फरार आरोपींना चार राज्यांतून अटक; धाराशिव LCB ची धडाकेबाज कारवाई!
आरणी येथील हॉटेल व्यावसायिकाची डोक्यात तसेच चेहऱ्यावर वार करून निर्घृण हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपींनी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून शेकडो किलोमीटर प्रवास केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन फरार आरोपींना अखेर ताब्यात घेतले.
आरणी येथील हॉटेल व्यावसायिक शुभम धर्मराज सोमवंशी (वय २६) यांची डोक्यात तसेच चेहऱ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिस ठाणे बेंबळी येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येनंतर आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी धाराशिव येथून सोलापूर रेल्वे स्थानक, यादगीर (कर्नाटक), हैदराबाद, निजामाबाद आणि तूप्रान (तेलंगणा) परिसरातून प्रवास केल्याची माहिती समोर आली. वेगवेगळ्या ठिकाणी हालचाली करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.
या कारवाईत समेश पांडव मेहेर (वय ३२, रा. खटमुंडा, ता. भटली, जि. बरगड, ओडिशा), मोहम्मद वारिस सफेल अन्सारी (वय १९) आणि मधुभूर ता. मधुभूर, जि. देवघर, झारखंड येथील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले.
गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या या कारवाईमुळे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची सतर्कता, समन्वय आणि तपासातील चिकाटी पुन्हा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या उल्लेखनीय कारवाईसाठी पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोहेकॉ शौकत पठाण, पोहेकॉ प्रकाश औताडे, पोहेकॉ जावेद काझी, पोहेकॉ फरहान पठाण, पोहेकॉ दयानंद गादेकर तसेच पोलीस कर्मचारी नागनाथ गुरव आणि प्रकाश बोईनवाड यांनी यशस्वी कामगिरी बजावली.











