धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील २ कोटी ३९ लाखांच्या व्यवहारावर संशय;
केंद्रीय भांडारविरोधात गंभीर तक्रार!सॉफ्टवेअर उपलब्ध नसतानाही ९९ लाख ९९ हजारांचे देयक अदा केल्याचा आरोप; १ कोटी २५ लाखांचे कॉम्पॅक्टर निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार
धाराशिव लोकविचार
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय कामकाजासाठी केंद्रीय भांडार, मुंबई यांच्यामार्फत करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर स्कॅनिंग व कॉम्पॅक्टर खरेदी प्रकरणात तब्बल २ कोटी ३९ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काम पूर्ण न करता देयके अदा करणे, आवश्यक सॉफ्टवेअर उपलब्ध नसणे, निकृष्ट दर्जाचे कॉम्पॅक्टर पुरविणे तसेच खरेदी प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शासकीय अधिकारी आणि केंद्रीय भांडार यांच्यात संगनमत झाल्याचा संशय व्यक्त करत अविनाश पार्श्वनाथ गडदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी व विभागीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तक्रारदार गडदे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत केंद्रीय भांडार, मुंबई यांच्याशी संबंधित कामकाजाची माहिती मागवली होती. सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र, नंतर प्राप्त झालेल्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर अनेक गंभीर बाबी समोर आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सॉफ्टवेअर स्कॅनिंग आणि कॉम्पॅक्टर पुरवठ्याच्या कामासाठी एकूण २ कोटी ३९ लाख रुपये अदा करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.सॉफ्टवेअर उपलब्ध नसताना ९९ लाख ९९ हजारांचे देयक!सॉफ्टवेअर स्कॅनिंगच्या कामासाठी केंद्रीय भांडार, मुंबई यांना ९९ लाख ९९ हजार ९०७ रुपये अदा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मात्र, या कामाची परचेस ऑर्डर संबंधित संचिकेत उपलब्ध नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सॉफ्टवेअर कुठे इन्स्टॉल करण्यात आले, इन्स्टॉलेशननंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कोणता अहवाल दिला, तसेच सॉफ्टवेअरच्या वॉरंटीबाबत केंद्रीय भांडारने कोणते पत्र दिले, यासंबंधीची कागदपत्रेही संचिकेत उपलब्ध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
विशेष म्हणजे, एनआयसीकडून सकारात्मक तांत्रिक अहवाल असल्याचे कागदपत्रांत दिसत असले, तरी प्रत्यक्षात सदर सॉफ्टवेअर जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसून आजपर्यंत शासकीय कामकाजासाठी वापरात आलेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर प्रत्यक्षात उपलब्ध नसताना त्याचे पूर्ण देयक कसे अदा करण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
१ कोटी २५ लाखांचे कॉम्पॅक्टर; परचेस ऑर्डर आणि तपासणी अहवालाचा अभाव!कॉम्पॅक्टर खरेदी प्रकरणातही गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. केंद्रीय भांडार, मुंबई यांना परचेस ऑर्डर न देता तब्बल १ कोटी २५ लाख रुपये आगाऊ देण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.
याशिवाय कॉम्पॅक्टर कुठे बसविण्यात आले, त्याच्या इन्स्टॉलेशनबाबत अधिकाऱ्यांनी कोणता अहवाल दिला, त्याची वॉरंटी किती आहे आणि सक्षम तांत्रिक अधिकाऱ्याने त्याची तपासणी केली आहे का, यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे संचिकेत उपलब्ध नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
केंद्रीय भांडारने निश्चित केलेल्या स्पेसिफिकेशननुसार कॉम्पॅक्टर बसविण्यात आले नसून प्रत्यक्ष पुरवठा निकृष्ट दर्जाचा असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही शासनाला अपेक्षित दर्जाची यंत्रणा मिळाली आहे का, याची तांत्रिक तपासणी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्रीय भांडारच्या दरकरार अधिकारावरही प्रश्नचिन्ह!केंद्रीय भांडार, मुंबई ही नोंदणीकृत सोसायटी असून तिला केंद्र किंवा राज्य शासनाची अधिकृत संस्था म्हणून मान्यता नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
तसेच शासनाच्या वतीने शासकीय दरकरार करण्याचे अधिकार या संस्थेला देण्यात आलेले नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.यासंदर्भात उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांची २६ सप्टेंबर २०१४ रोजीची परिपत्रके तसेच १० जून २०१४ रोजीचे संगणक दरकरारासंदर्भातील परिपत्रक तक्रारीसोबत नमूद करण्यात आले आहे. या परिपत्रकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय भांडारच्या दरकराराच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोट्यवधी रुपयांची कामे कशा पद्धतीने मंजूर करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
निजामकालीन सातबारा दस्तऐवजांच्या डिजिटल जतनाचा प्रश्न ऐरणीवर!या प्रकरणाला ऐतिहासिक आणि प्रशासकीय महत्त्वाचीही बाजू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जतन करण्यात आलेले निजामकालीन सातबारा दस्तऐवज हे धाराशिव जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहेत. सध्या सुरू असलेल्या मराठा-कुणबी वंशावळ शोध मोहिमेसाठीही या दस्तऐवजांचे महत्त्व मोठे आहे.
मात्र, स्कॅनिंग सॉफ्टवेअरचा डेटा उपलब्ध नसल्यामुळे संबंधित ऐतिहासिक दस्तऐवज शोधण्यात अडचणी येत असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. त्यामुळे केवळ आर्थिक व्यवहारांचाच नव्हे, तर महत्त्वाच्या शासकीय अभिलेखांच्या डिजिटल जतनाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
अंतिम १३ लाख ९० हजारांचा धनादेश अभिजीत देशपांडे यांच्या माध्यमातून?तक्रारीत आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. एकूण व्यवहारातील १३ लाख ९० हजार रुपयांचा अंतिम धनादेश अभिजीत देशपांडे यांच्या माध्यमातून देण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काम पूर्ण झाले नसताना अंतिम देयक अदा करण्यात आले असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
स्वतंत्र चौकशीसह फौजदारी कारवाईची मागणीया संपूर्ण प्रकरणाची दक्षता विभाग किंवा लोकायुक्त स्तरावर स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, केंद्रीय भांडार, मुंबई आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी तसेच विभागीय कारवाई करावी आणि शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, अशा तीन प्रमुख मागण्या तक्रारदार अविनाश पार्श्वनाथ गडदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
या तक्रारीच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील यांनाही माहिती व आवश्यक पाठपुराव्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, २ कोटी ३९ लाख रुपयांच्या या व्यवहारात नेमकी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली, सॉफ्टवेअर आणि कॉम्पॅक्टरची प्रत्यक्ष स्थिती काय आहे, देयके कोणत्या आधारावर अदा करण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, या प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतूनच स्पष्ट होणार आहेत.
त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन कोणती भूमिका घेते आणि या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786










