येडशी करंडे कुटुंबावरील अग्नितांडवातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख; एकाच कुटुंबाला मिळणार नऊ लाखांची मदत!
मुख्यमंत्री सहायता निधीतून सहा मृतांच्या कायदेशीर वारसांसाठी सहा लाख, तर घर व दुकानाच्या नुकसानीपोटी तीन लाखांचे अर्थसहाय्य मंजूर; संपूर्ण दुर्घटनेतील नुकसान एकाच करंडे कुटुंबाचे!
धाराशिव | लोकविचार
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे १ नोव्हेंबर २०२६ रोजी करंडे कुटुंबाच्या घरासह दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेची दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कायदेशीर वारसांसह आगीत जळून खाक झालेल्या घर व दुकानाच्या नुकसानीपोटी एकूण नऊ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सचिवालयाकडून २३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
या भीषण आगीत उत्तम करंडे, चंद्रकला करंडे, गोविंद करंडे, ज्योती करंडे, गायत्री करंडे आणि सिद्धी करंडे या एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे करंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. विशेष म्हणजे या कुटुंबाचे राहते घर आणि दुकाने एकाच ठिकाणी होती. आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण घर आणि दुकानांचा परिसर आल्याने एकाच कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या पत्रानुसार, आगीत मृत्यू झालेल्या सहा व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे सहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर याच करंडे कुटुंबाच्या किराणा दुकान, गिफ्ट वेअर दुकान आणि राहत्या घराच्या नुकसानीपोटी प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे आणखी तीन लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
एकाच करंडे कुटुंबाला मिळणार संपूर्ण नऊ लाखांची मदत!
या मदतीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे आगीत मृत्युमुखी पडलेले सहा जण आणि जळून नुकसान झालेली दुकाने व राहते घर हे सर्व एकाच कुटुंबाचे आहे. त्यामुळे सहा मृतांच्या कायदेशीर वारसांसाठी मंजूर झालेले सहा लाख रुपये आणि घर व दुकानांच्या नुकसानीपोटी मंजूर झालेले तीन लाख रुपये असे एकूण नऊ लाख रुपयांचे अर्थसहाय्य याच पीडित कुटुंबाला मिळणार आहे. ही मदत दुर्घटनेत नुकसान झालेल्या एकाच कुटुंबासाठी मंजूर करण्यात आली आहे.
बँक खात्यात रक्कम वर्ग करण्याचे निर्देश
मंजूर करण्यात आलेली अर्थसहाय्याची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई शाखेकडून धाराशिव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखेतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
या मदत निधीचे वाटप करण्यापूर्वी मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांची तसेच नुकसानग्रस्त मालमत्तेची आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी करावी. अर्थसहाय्याची रक्कम मंजूर केलेल्या प्रयोजनासाठीच वापरण्यात येणार असल्याबाबत विनियोग प्रमाणपत्र सादर करावे, तसेच मदत वितरित झाल्यानंतर त्याच्या पावत्या व आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठवावीत, असे निर्देशही पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
येडशी येथील या दुर्दैवी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांना जीव गमवावा लागला, तर त्याच कुटुंबाचे राहते घर आणि दुकानेही आगीत जळून खाक झाली होती. अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या करंडे कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेली नऊ लाख रुपयांची मदत आर्थिक आधार देणारी ठरणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











