कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत; तपासाला गती, महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
बीड जिल्ह्यातील केज येथून रेवण सोपान नखाते याला अटक; नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा अद्याप कारागृहातच
धाराशिव | लोकविचार
कळंब येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले असून, बीड जिल्ह्यातील केज येथून रेवण सोपान नखाते या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या गुन्ह्यात सात आरोपींना अटक करण्यात आली होती. आता आठवा आरोपी निष्पन्न होऊन पोलिसांच्या ताब्यात आल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे. ड्रग्ज तस्करीच्या सिंडिकेटचे धागेदोरे हळूहळू समोर येत आहे.कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंब शहरातील ड्रग्ज विक्री आणि व्यसनाधीनतेचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले जात आहे. शेजारील बीड, केज, परभणी आणि पुणे या भागांपर्यंत या सिंडिकेटचे जाळे पसरले असण्याची शक्यता आहे.
धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख तपास करीत आहेत. या प्रकरणात निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे, लखन गायकवाड, अक्षय रिटे, नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा, सुशांत सुतार आणि सागर किसन गराडे (रा. जांभुळगाव, ता. मावळ, जि. पुणे) या सात आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. हे आरोपी कारागृहात आहेत. पोलिसांकडून बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा आणि लखन विजय गायकवाड यांचे नियमित जामीन अर्ज कळंब येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. मंडे यांनी फेटाळले आहेत. सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. महेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. परभणी येथील गुन्ह्यातही नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा याचा सहभाग आढळून आल्याने तो परभणी कारागृहात आहे, तर अन्य आरोपी धाराशिव कारागृहात आहेत. मोहसीन सलीम मिर्झा अद्यापही कारागृहातच आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून त्याची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ४ ऑगस्ट रोजी दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर कळंब येथील ड्रग्ज तस्करीचे प्रकरण उघडकीस आले. या कारवाईत ११.२१ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपींकडून ५५ हजार रुपये किमतीचे ड्रग्ज आणि दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या कारवाईत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि खटके, कळंब पोलीस ठाण्याचे सपोनि मगर, पोहेकॉ राठोड, पोहेकॉ जानराव, पोहेकॉ गादेकर, पोहेकॉ जाधवर, पोहेकॉ चौरे, पोना जाधवर, पोना ढगारे, पोअं मुंगळे, कळंब पोलीस ठाण्याचे पोहेकॉ शेख, पोहेकॉ माळवे, पोअं बोईनवाड, पोहेकॉ आरब आणि चापोहेकॉ माने यांचा सहभाग होता.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786










