धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
कचरावेचकांच्या सुरक्षिततेसाठी धाराशिव नगरपरिषदेचा पुढाकार; नीता अंधारे, अजित गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यवृद्धी प्रशिक्षण
धाराशिव | लोकविचार
धाराशिव नगरपरिषदेच्या वतीने कचरावेचकांच्या व्यावसायिक सुरक्षिततेसह आरोग्य व कौशल्यवृद्धीला प्राधान्य देत महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. NSKFDC (National Safai Karamcharis Finance & Development Corporation) यांच्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेअंतर्गत नगरपरिषद हद्दीतील कचरावेचकांसाठी नगरपरिषद प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले. मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वच्छता निरीक्षक तथा उपमुख्याधिकारी अजित गोरे यांच्या सहकार्याने प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.
कचरावेचकांना दैनंदिन काम करताना येणारे संभाव्य धोके, कामाच्या ठिकाणी घ्यावयाची सुरक्षितता, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा योग्य वापर, आरोग्य व स्वच्छता, कचऱ्याची सुरक्षित हाताळणी तसेच कामाशी संबंधित आवश्यक कौशल्यांबाबत प्रशिक्षणादरम्यान सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अहिल्या शिक्षण संस्था, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणासाठी प्रमुख प्रशिक्षक अविनाश साखरे यांनी मार्गदर्शन केले, तर सहाय्यक प्रशिक्षक प्रतीक सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. नगरपरिषद हद्दीतील एकूण ४३ कचरावेचकांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कचरावेचकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न केवळ स्वच्छता व्यवस्थेपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या व्यावसायिक कौशल्यविकासाला आणि सामाजिक सक्षमीकरणाला जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
NAMASTE योजनेच्या माध्यमातून कचरावेचकांना सुरक्षित कामकाजाच्या पद्धतींची माहिती मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन कामातील जोखीम कमी करण्यास मदत होणार आहे.
नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेत प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या कचरावेचकांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची भूमिका मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी घेतली आहे. त्याचबरोबर स्वच्छता विभागाच्या माध्यमातून उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक तथा उपमुख्याधिकारी अजित गोरे यांनी केलेले सहकार्यही महत्त्वाचे ठरले.
कचरावेचकांच्या कामाला सुरक्षितता, कौशल्य आणि सन्मानाची जोड देणारे हे प्रशिक्षण नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











