कळंब ड्रग्स प्रकरण – नगरसेवक मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला; पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन बळ;
कळंब/धाराशिव | लोकविचार
कळंब शहरातील चर्चेत असलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाचे बळ मिळाले आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा (वय 39, रा. कळंब), लखन विजय गायकवाड (वय 37, रा. कळंब) यांनी दाखल केलेले जामीन अर्ज न्यायाधीश मांडे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब यांनी दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी फेटाळले आहेत.
या निर्णयामुळे कळंब पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासाची दिशा आणि न्यायालयासमोर मांडण्यात आलेली बाजू महत्त्वाची ठरली आहे.
पोलिसांच्या तपासाची न्यायालयात पुराव्यानिशी केलेली मांडणी
कळंब ड्रग्स प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख करीत आहेत.या प्रकरणातील आरोपींविरोधातील तपासाची माहिती, उपलब्ध पुरावे आणि तपासाची दिशा न्यायालयासमोर मांडण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने मोहसीन मिर्झा आणि लखन गायकवाड या दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.
जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने या प्रकरणातील तपास यंत्रणेने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीकडेही लक्ष वेधले गेले आहे. तपासामध्ये पारदर्शकता ठेवून कायदेशीर प्रक्रियेनुसार पुरावे संकलित करणे आणि ते न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडणे, या बाबी या प्रकरणात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
लखन गायकवाड आणि मोहसीन मिर्झा यांचे जामीन अर्ज फेटाळले गेल्याने सध्या पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाचे बळ मिळाले आहे. आता पुढील तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि या प्रकरणाचे संपूर्ण चित्र कधी स्पष्ट होते, याकडे कळंबसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद | 083900 88786











