स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई; पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद
१० गुन्ह्यांतील आरोपी निष्पन्न; चोरीचा मुद्देमालही हस्तगत
धाराशिव | लोकविचार
स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई करत देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन संशयित आरोपींना जेरबंद केले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील तब्बल १० गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली असून, गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.
दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सपोनि कासार व पथकाकडून दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी तसेच पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयित इसमांना भूम परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच ताब्यातील आरोपींकडे केलेल्या चौकशीतून भूम पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या एका गुन्ह्याची उकल झाली. या गुन्ह्यातील सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे किंमत ८० हजार रुपये, पोलिसांनी हस्तगत केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिल उर्फ शेंड्या आबा काळे (वय २४), रा. खामकरवाडी, पारधी पिढी, ता. वाशी, जि. धाराशिव आणि पवन उर्फ छगन महादेव काळे (वय २१) यांचा समावेश आहे. आरोपींकडून पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि चोरीतील सोन्याची अंगठी असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे जिल्ह्यातील १० गुन्ह्यांमध्ये निष्पन्न आरोपी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कारवाईमुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे भूम येथे रिमांडसाठी हजर करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोक्खर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सुदर्शन कासार, पोहेकॉ पठन, पोहेकॉ प्रकाश ओताडे, पोहेकॉ जावेद काझी, पोहेकॉ फरहान पठाण, चापोहेकॉ नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे व आरक्षी पथक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











