शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर
धाराशिव लोकविचार
शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला कंटेनरची भीषण धडक बसल्याने २२ ते २३ भाविक जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री येडशी टोलनाक्यापुढे ढोकी रोड टी पॉइंट आळणी पाटीजवळ घडली. या अपघातात दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२५ पी-४००३ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून उमरगा तालुक्यातील नारगवाळी, बोरी आणि मातोळा येथील भाविक शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होते. याच दरम्यान येडशी टोलनाक्यापुढे ढोकी रोडवरील टी पॉइंट आळणी पाटीजवळ पिकअप आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनातील अनेक भाविक गंभीर जखमी झाले. वाहनात मोठ्या संख्येने महिला भाविकांचाही समावेश असल्याचे देखील बोलले जात आहे.
अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि मदत पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
डॉक्टरांकडून सर्व जखमींवर उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच जखमींची संपूर्ण नावे आणि अपघाताबाबतची अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून, अधिकृत माहितीनंतर जखमींची ओळख व अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

