स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; 10 गाई, दोन पिकअपसह 18.05 लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील येडशी टोलनाका परिसरात अवैधरीत्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धडक कारवाई करत 10 गाई व दोन पिकअप वाहने असा एकूण 18 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 जुलै 2026 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे 187/2026 अन्वये भारतीय प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 चे कलम 11(1)(ब) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 चे कलम 5A(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यात दशरथ शंकर जगदाळे (वय 52, रा. हिवरा, ता. भूम) आणि बालाजी भिकाजी सोनवणे (वय 38, रा. भोनगिरी, ता. भूम) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येडशी टोलनाका परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान 10 गाई व दोन पिकअप वाहने असा एकूण ₹18,05,000 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
या कारवाईत स.पो.नि. आत्माराम जाधव, पो.ह. प्रदीप वाघमारे, म.पो.ह. शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चा.पो.कॉ. बोईनवाड, शेरखाने तसेच क्यूआरटी (QRT) पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे करीत असून, अवैध गोवंश वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढेही अशाच प्रभावी कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


